नालासोपारा: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:20 IST2025-08-07T18:17:20+5:302025-08-07T18:20:38+5:30
अब्दुल मोचीन इद्रिस खान (२८), चेतन सुरेश वाघ ऊर्फ कोबरा ऊर्फ सैफ (२४) आणि मोहम्मद झिशान अब्दुल अबरार अहमद (३४) अशी तिघांची नावे

नालासोपारा: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): महिला पायी चालत जात असताना त्यांच्या गळ्यातून सोन्याची चेन खेचून पळून गेलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात बोळींजच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. बोळींजच्या सखाराम संकुलमधील अमृत योग इमारतीत राहणाऱ्या रंजना कालेकर (५३) यांच्या गळ्यातून २० जुलैला दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास सोनसाखळी चोरली. त्या आपल्या नातीला शाळेत सोडून जकात नाका येथून पायी रस्त्याने घरी जात होत्या. त्यावेळी आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी झटापट करून गळ्यावर दुखापत करून सोन्याची चेन खेचून नेली होती. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाच्या परिसरातील तसेच आरोपीत पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण यांच्याआधारे आरोपी अब्दुल मोचीन इद्रिस खान (२८) आणि मोहम्मद झिशान अब्दुल अबरार अहमद (३४) या दोघांना भांडूप येथून व चेतन सुरेश वाघ ऊर्फ कोबरा ऊर्फ सैफ (२४) याला दिवा येथून अटक केले आहे. आरोपीकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची कार हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी चोरी केलेली सोन्याची चेन कांजुरमार्ग येथे गहाण ठेवल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच अटक आरोपीकडे केलेल्या तपासात त्यांनी अशाच प्रकारे सफाळे येथे जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.