Nagpur: A credit scheme scam exposed again | नागपुरातील पुन्हा एका पतसंस्थेचा घोटाळा उघड
नागपुरातील पुन्हा एका पतसंस्थेचा घोटाळा उघड

ठळक मुद्देकोट्यवधींची अफरातफर : कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ७० लाखांच्या गुंतवणुकीवर महिन्याला ६० हजार रुपये व्याज देतो, अशी थाप मारून एका पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवीदाराची लाखोंची रक्कम हडपली. महालमधील एका पतसंस्थेचा हा घोटाळा उघड झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी बापलेकांसह १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. दरम्यान, शहरातील पुन्हा एका सोसायटीचा घोटाळा उघड झाल्याने ठेवीदारात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काही वर्षांपूर्वी आरोपी रमेश बाबुराव पुंड, मनीष रमेश पुंड, पंकज रमेश पुंड (तिघेही रा. महाल किल्ला मातामंदिरजवळ) यांनी जागती जनसेवा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सहकारी सोसायटी सुरू केली होती. आरोपी रमेश पुंड आणि फिर्यादी राजेश ऊर्फ राजू हरिभाऊ नगरधने (वय ४८, रा. गजानन मंदिरजवळ, महाल नागपूर) यांची मैत्री होती. नगरधने यांनी २०१४-१५ मध्ये त्यांची वडिलोपार्जित शेती विकली होती. त्यातून त्यांच्याकडे मोठी रक्कम आली होती. ते माहीत असल्यामुळे आरोपी रमेश पुंड आणि त्याच्या दोन्ही मुलांनी नगरधने यांच्याशी सलगी वाढवली. संबंधांचा गैरफायदा घेत महिन्याला ६० ते ७० हजार रुपये व्याज देतो, अशी थाप मारून त्यांच्या सुमारे पाऊण कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या मुदतीच्या एफडी आपल्या पतसंस्थेत ठेवण्यास भाग पाडले. प्रारंभी काही महिने व्याज दिले, नंतर मात्र व्याज देणे बंद केले. ठेवीची मुदत संपल्याबरोबर तुमची रक्कम दिली जाईल, असे आरोपी सांगत होते. एकूण ठेवीपैकी तीन ठेवींची मुदत पूर्ण झाल्यामुळे नगरधने यांनी १ फेब्रुवारी २०१५ ला आपली ७ लाख २८ हजारांची रक्कम आणि त्यावरील व्याज आरोपींना मागितले. मात्र, आरोपी नुसती टाळाटाळ करून नगरधने यांना रक्कम देत नव्हते. आरोपी रमेश पुंड आणि त्याची दोन्ही मुले दाद देत नसल्यामुळे सोसायटीचे संचालक मोरेश्वर रामभाऊ खडसकर (रा. महाल कोतवाली), शंकरराव रामनाथजी पुंड (रा. ज्ञानेश्वरनगर, अजनी), किशोर बालाजी पौनिकर (रा. जयशंकर साई निवास, सक्करदरा), कुंदा विजय नगरधने, विजय हरिभाऊ नगरधने, बहादुरा फाटा, शिवमंदिर हुडकेश्वर), वसीम हमीदखान (रा. किल्ला रोड, महाल) आणि किरण प्रदीप मोहाडीकर (रा. पाठराबे किराणा स्टोर्सजवळ, मानेवाडा) यांच्याकडेही राजेश नगरधने यांनी दाद मागितली.
आपण शेती विकून सर्वच्या सर्व रक्कम तुमच्याकडे दिली. घर बांधण्यासाठी बँकेचे कर्ज घेतले. ती बँक आता आपल्याला नोटीस देत आहे, आजारपण आणि इतर कामांसाठी रकमेची आवश्यकता आहे, असे सांगून आपली रक्कम परत मागत होते. आरोपींना राजेश नगरधने विनंती करीत होते. मात्र, आरोपींनी त्यांना त्यांची रक्कम परत दिली नाही.

हमे तो अपनोंने लुटा !
विशेष म्हणजे, ज्या सोसायटीने राजेश नगरधने यांनी आपली रोकड गुंतविली होती, त्या सोसायटीत पदाधिकारी/संचालक म्हणून त्यांचा सख्खा भाऊ विजय नगरधने हा देखील कार्यरत आहे. मात्र, त्यानेही स्वत:च्या भावाची रक्कम बुडविण्यास हातभार लावला. तक्रार करून पोलिसही दाद देत नव्हते. त्यामुळे अखेर नगरधने यांनी कायदेशीर मार्ग चोखाळला अन् रविवारी अखेर कोतवाली पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Web Title: Nagpur: A credit scheme scam exposed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.