नागपुरात कुऱ्हाडीने हल्ला चढवून हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:48 IST2020-03-18T00:47:55+5:302020-03-18T00:48:34+5:30
बाकावर बसून असलेल्या तरुणावर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या एका आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली.

नागपुरात कुऱ्हाडीने हल्ला चढवून हत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाकावर बसून असलेल्या तरुणावर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या एका आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास कोतवालीत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. रूपचंद बिरजू चंद्रवंशी (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंगणा मार्गावरील पंचशीलनगरात राहतो.
गंगाबाई घाट भुतेश्वरनगरात राहणारा पंकज जयसिंगराव घोडिंगे (वय २०) याच्यासोबत आरोपी रूपचंदचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आरोपी रूपचंद सनकी स्वभावाचा असून, दारूच्या नशेत तो मनोरुग्णासारखाही वागतो, असे पोलीस सांगतात. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास पंकज त्याच्या घराजवळ असलेल्या साई शंकर मंदिराशेजारी, लोखंडी बाकावर बसून होता. आरोपी रूपचंद कुऱ्हाड घेऊन तेथे पोहचला आणि त्याने पंकजवर हल्ला चढवला. डोक्यावर, कपाळावर वार करून पंकजला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. पंकज त्या बाकावर निपचित पडला असताना आरोपी हातात कुऱ्हाड घेऊन आरडाओरड करीत दहशत पसरवीत होता. त्याची आरडाओरड ऐकून तेथे मोठी गर्दी जमली. गर्दीतील एकाने हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला, तर एकाने पोलिसांना कळविले. पोलिसांचे पथक तेथे पोहचताच आरोपी रूपचंद बेशुद्ध पडल्याचे नाटक करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जखमी पंकजला मेयोत दाखल करण्यात आले. सुनीता जयसिंगराव घोडिंगे (वय ३८) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी रूपचंदविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली.