मुंबई - कर्नाटकातील म्हैसूरमध्ये ४३४ कोटींच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झाला आहे. याठिकाणी ड्रग्ज तस्करीत मोठी कारवाई झाली. तपासाला सुरुवात झाली तेव्हा अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर आल्या. कशाप्रकारे ड्रग्जची तस्करी करणारे रॅकेट काम करत होते, कर्नाटकातून महाराष्ट्रापर्यंत ड्रग्जची तस्करी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरवठा केला जात होता. ड्रग्ज तस्कर त्यासाठी अनोखा आणि अगदी गुप्तपणे धंदा करत होते हे सर्व मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तपासात उघड केले आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, या नेटवर्कमध्ये शर्टचा फोटो कोडवर्ड म्हणून वापरला जात होता. ड्रग्ज पुरवठा आणि उत्पादन प्रक्रिया यासाठी २ वेगवेगळे गट काम करत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही गटाला एकमेकांबद्दल काहीच माहिती नव्हते. या ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आणि त्याच्या पुरवठा साखळीने संपूर्ण ऑपरेशनमध्ये सर्वात धोकादायक आणि धूर्त मोडस ऑपरेंडी वापरली. अशा प्रकारच्या नेटवर्कचे धागेदोरे शोधून काढणे अत्यंत कठीण होते. मात्र हाय-टेक पोलिसांनी ते उलगडले असं सांगण्यात आले.
म्हैसूर इथल्या फॅक्टरीत ड्रग्ज तयार केले जात होते. तिथे काम करणाऱ्यांना ते ड्रग्ज कुठे जातात याची कल्पना नव्हती. ड्रग्जची खेप दुसऱ्या गँगकडून सर्वात आधी कर्नाटकची राजधानी बंगळुरूपर्यंत पोहचवले जात होते. बंगळुरूत मुंबईत काम करणारी गँग आधीच उपस्थित असायची. ड्रग्स पुरवठा करणारे आणि त्यांना घेऊन येणारे एकमेकांना कोड दाखवायचे. हा कोड एक टीशर्ट होता. जो प्रत्येक खेपेसाठी वेगवेगळा वापरला जात होता. दोघांकडे सारख्याच रंगाचा टीशर्ट फोटो व्हॉट्सअपला पाठवला जात होता. त्यानंतर दोघांमध्ये देवाणघेवाण व्हायची. याचप्रकारे बंगळुरूहून ड्रग्जची खेप मुंबईपर्यंत आणली जात होती. त्यानंतर मुंबईत विविध भागत स्थानिक सप्लायर्सकडून त्याचा पुरवठा केला जायचा असंही मुंबई पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, विशेष म्हणजे या ड्रग्जचा पुरवठा रस्ते मार्गाने केला जायचा. हवाई आणि ट्रेन मार्गाने तपासापासून वाचण्यासाठी याचा रस्ते वाहतूक केली जायची. बस, खासगी वाहनाच्या माध्यमातून ड्रग्ज ने-आण केले जात होते. म्हैसूर ते बंगळुरू आणि बंगळुरूहून मुंबईपर्यंत ड्रग्ज लपवून आणले जात होते. या तस्करांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा दिला होता. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणेची एन्ट्री झाली असून सोमवारी अधिकाऱ्यांनी आरोपींची चौकशी केली. हे ड्रग्ज केवळ स्थानिक पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहचवले जात असेल असा संशय अधिकाऱ्यांना आहे. सध्या हे पूर्ण नेटवर्क शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.