लखनौ - शहरातील पोलीस कॅम्पमधील ३० जुलै २०२५ च्या एका घटनेने सर्वांनाच हैराण केले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुकेश सिंह यांची पत्नी नितेश सिंह यांचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. या घटनेमागची कहाणी अत्यंत दु:खद आहे. त्यात मानसिक छळ, कौटुंबिक तणाव आणि एका आईचा अपेक्षा भंग हे सामावलेले आहे. जिने १२ वर्षीय ऑटिझम पीडित मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर स्वत:चे आयुष्य संपवले.
२९ जुलैच्या रात्री नितेश सिंहने मुलगा अनिकेतसोबत असं काही केले, जे पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे भयंकर दृश्य कैद झाले. फुटेजमध्ये नितेश स्वत:च्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला मारण्याचा प्रयत्न करते. अनिकेत जो ऑटिझम या आजाराने ग्रस्त आहे. तो तडफडू लागतो. उशी हटवल्यानंतर नितेश दोन्ही हातांनी त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते. परंतु अनिकेत कसंबसं स्वत:ला तिच्या तावडीतून वाचवतो. हे दृश्य फक्त १० सेकंदाचे आहे जे नितेशच्या मृत्यूनंतर समोर आले.
मृत नितेश सिंहचा भाऊ प्रमोद कुमारने सांगितले की, माझी बहीण दीर्घ काळापासून मानसिक तणावाखाली होती. तिचा पती मुकेश सिंह बहिणीचा कायम मानसिक छळ करत होता. मुकेशचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ज्यावरून दोघांमध्ये वाद होते. नितेशने एकदा त्या महिला अधिकाऱ्यासोबत अश्लील संभाषण करताना दोघांना पकडले होते. त्यानंतर मुकेशचं वागणे बदलले. तो पत्नी नितेशसोबत क्रूर वागू लागला. मुकेश नितेशला टोमणे मारायचा. एका आजारी मुलाला तू जन्म दिला, ज्याला आयुष्यभर सांभाळावे लागणार असं म्हणायचा. पती मुकेशचं टोचून बोलणे पत्नी नितेशला सहन होत नव्हते. ती तिच्या मुलावर खूप प्रेम करायची पण सततचा अपमान, मानसिक छळ यामुळे तिच्या सहन करण्यापलीकडे गेले असा आरोप मृत नितेशच्या भावाने केला आहे.
बसपाच्या माजी आमदाराची मुलगी होती नितेश
नितेश सिंह फिरोजाबाद इथले माजी आमदार राकेश बाबू यांची मुलगी होती. राकेश बाबू जे आता भाजपात आहेत. २००७ ते २०१७ पर्यंत ते आमदार होते. नितेशचे लग्न मुकेश सिंह यांच्यासोबत झाले होते. मुकेश एक पीपीएस अधिकारी होते, सध्या ते लखनौ येथे एएसपी म्हणून कार्यरत आहेत. ३ महिन्यापूर्वीच त्यांची बरेलीहून लखनौला बदली झाली होती. २९ जुलैला पती-पत्नी दोघांमध्ये वाद झाले. त्यातून नितेश नैराश्येत गेली. पुढच्या दिवशी ३० जुलैला तिने आयुष्य संपवले. मुकेशने घरात लावलेल्या सीसीटीव्हीतून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचा. २९ जुलैचं फुटेज त्याच्या मोबाईलवर होते. ज्यात नितेश मुलाला मारण्याचा प्रयत्न करत होती.
दरम्यान, नितेशच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या मृत्यूमागे एका आईची मानसिक अवस्था जबाबदार होती की कौटुंबिक तणाव, पतीकडून होणारा छळ याचे कारण होते? आजाराने ग्रस्त मुलगा अनिकेत या घटनेचा मूक साक्षीदार होणार का? आता त्याला आईची माया कोण देणार ज्याची त्याला गरज आहे हे प्रश्न कायम आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज या तपासात महत्त्वाचा पुरावा बनला आहे. ही कहाणी फक्त एका कुटुंबाची नाही तर अशा असंख्य लोकांची आहे जे मानसिक तणावाखाली, एकटेपणाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.