बिहारमधील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचं खोटं सांगून दागिन्यांच्या दुकानातून तब्बल २ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने चोरले आहेत. ही घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकानदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरच्या काझीमुहम्मदपूर पोलीस स्टेशन परिसरातील लेनिन चौकात असलेल्या आम्रपाली ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. दुकानाचे मालक चंदन कुमार यांच्या म्हणण्यानुसार, एक माणूस ग्राहक असल्याचं भासवून दुकानात आला. प्रथम त्याने चांदीची वस्तू विकत घेतली आणि पैसे दिले, ज्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर त्याने सोन्याचे दागिने पाहण्याची मागणी केली आणि दुकानदाराला सांगितलं की त्यांच्या मॅडम येत आहे आणि त्यांना आवडलेले दागिने बाजूला ठेवावेत.
काही वेळाने दुसरा एक व्यक्ती दुकानात आला, ज्याने आर्मीची टोपी घातली होती. त्याने पहिल्या येणाऱ्या व्यक्तीला 'सर' असं म्हटलं आणि शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून स्वतःची ओळख करून दिली. त्याने बनावट पोलीस ओळखपत्रही दाखवलं. दोघांनीही दुकानदाराकडून सवलत मागितली आणि बोलत असताना दागिन्यांकडे पुन्हा पुन्हा हात फिरवत राहिले.
याच दरम्यान संधीचा फायदा घेत दोघेही मिळून ड्रॉवरमध्ये ठेवलेले एक पॅकेट घेऊन पळून गेले. त्या पॅकेटमध्ये सुमारे २ लाख रुपयांचे दागिने होते, ज्यामध्ये सोन्याचे कानातले आणि इतर अनेक लहान दागिने होते.
दुकानदार चंदन कुमारने दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम एक माणूस ग्राहक म्हणून आला, त्याने चांदीच्या वस्तू खरेदी केल्या, नंतर सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. थोड्या वेळाने दुसरा एक व्यक्ती आला, त्याने स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून दिली आणि त्याचं पोलीस ओळखपत्र दाखवलं. दोघांनाही गप्पा मारून गुपचूप पॅकेट चोरलं.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवली जात असल्याचं पोलीस स्टेशन प्रमुख प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितलं. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.