लाज नाही वाटत तुला? हिंदू तरुणासोबत बाईकवरून जाणाऱ्या मुस्लिम महिलेला दोघांनी रोखलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 15:31 IST2021-09-19T15:26:51+5:302021-09-19T15:31:11+5:30
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; महिलेला दुचाकीवरून उतरून एकटं जाण्यास भाग पाडलं

लाज नाही वाटत तुला? हिंदू तरुणासोबत बाईकवरून जाणाऱ्या मुस्लिम महिलेला दोघांनी रोखलं
बंगळुरू: एका हिंदू तरुणासोबत दुचाकीवरून जात असलेल्या मुस्लिम महिलेला दोन अज्ञातांनी रस्त्यात रोखल्याचा प्रकार कर्नाटकची राजधानी बंगळुरूत घडला आहे. अज्ञातांनी महिलेला थांबवत तिच्यासोबत गैरवर्तन केलं. अज्ञात दोघांनी महिलेला तिच्या पतीला फोन करण्यास सांगितलं. त्यानंतर महिलेला दुचाकीवरून खाली उतरण्यास सांगून तिला एकटीच घरी जाण्यास भाग पाडलं.
बंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन अज्ञात तरूण एका दुचाकीचा पाठलाग करून त्यावरून प्रवास करत असलेल्या दोघांशी गैरवर्तन करत असल्याचं दिसत आहेत. अशा प्रकारची घटना घडली असल्याचं मिको लेआऊट पोलिसांनी सांगितलं. घटना शुक्रवारी रात्री घडली असून अद्याप तरी या प्रकरणी कोणीही तक्रार केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
...जेव्हा वर्चस्वासाठी १८ फुटांचे दोन किंग कोब्रा भिडतात; थरारक VIDEO व्हायरल
व्हायरल झालेला व्हिडीओ २ मिनिटं ५४ सेकंदांचा आहे. त्यात काही जण दुचाकीस्वाराला मारहाण करत असताना दिसत आहेत. बुरखा परिधान केलेल्या महिलेला दुचाकीवरून बसवून अशा प्रकारे कुठे नेत आहेस, असा प्रश्न अज्ञात विचारतात. त्यानंतर त्यातला एक जण महिलेला तिचं नाव विचारतो. 'काळ वेळ कशी चालली आहे? तुला लाज वाटत नाही का? अशी बसून याच्यासोबत का जात आहेस?,' असे प्रश्न अज्ञातानं विचारले. त्यानंतर त्यानं महिलेच्या पतीचा फोन नंबर मागितला. महिलेनं स्वत:च तिच्या पतीला फोन लावून दिला.
दोघांपैकी एका अज्ञातानं महिलेच्या पतीचा फोन नंबर घेऊन त्याला फोन केला. त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीनं संवाद साधला. दुचाकीवरून उतर आणि एकटीच घरी जा, असं या तरुणानं महिलेला सांगितलं. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओच्या आधारे दोन आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.