Meerut Murder Case: माजी मर्चंट नेव्ही अधिकारी आणि पती सौरभ यांच्या हत्येचा आरोप असलेली मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल चार दिवसांसाठी मेरठ तुरुंगात बंद आहेत. तुरुंगात त्यांना ड्रग्ज न मिळाल्याने दोघेही अस्वस्थ दिसत होते. त्यामुळे त्यांची झोपही उडाली असून, साहिलची तब्येत बिघडली आहे. दोघांनाही जेवण जात नसल्याचे तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितले.
व्यसनमुक्ती केंद्राच्या समुपदेशकाने साहिल व मुस्कान यांचे समुपदेशन केले आहे. दोघांनाही औषधे दिली जात असून, त्यांच्यावरील ड्रग्जचा अंमल हळूहळू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मुस्कानच्या गरोदरपणाच्या बातम्यांदरम्यान, तुरुंग अधीक्षकांनी सांगितले की, लवकरच तिची गर्भधारणा चाचणी केली जाईल.
मुस्कान आणि साहिल हे ड्रग्जचे व्यसनी असल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुरुंगात आल्यानंतर ड्रग्ज मिळत नसल्याने त्यांची प्रकृती बिघडू लागली आणि दोघांनाही अस्वस्थता आणि चक्कर येऊ लागली आहे. त्यांना रात्री नीट झोपही येत नाही. (वृत्तसंस्था)
गप्प बसते, चेहरा लपविते
तुरुंगात साहिल आणि मुस्कानला कोणीही भेटायला आले नाही. दोघांनाही वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. मुस्कान तुरुंगात अगदी गप्प बसून असून, ती चेहरा लपवून बसते. फक्त जेवण आणि नाश्त्याच्या वेळी तिच्या चेहऱ्यावरून कपडे काढते. मुस्कान व साहिलने ३ मार्च रोजी सौरभची हत्या केली होती.
व्हॉट्सॲपमुळे पुन्हा एकत्र
मुस्कान आणि सौरभ राजपूतने २०१६ मध्ये कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. दोघांना सहा वर्षांची मुलगीही आहे. पोलिसांनी सांगितले की, मुस्कान आणि साहिल शालेय दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते आणि २०१९ मध्ये व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले होते.