धक्कादायक! मुंबईकडे पायी निघालेल्याचा पैशांसाठी खून,तीन अल्पवयीन मुले जेरबंद; देहूरोड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:31 PM2020-06-15T17:31:12+5:302020-06-15T17:31:59+5:30

कपड्यांच्या टेलर टॅगवरून पोलिसांनी पटवली मृतदेहाची ओळख

Murdered of person for money who going foot to Mumbai due to lockdown; Three minors arrested in Telangana | धक्कादायक! मुंबईकडे पायी निघालेल्याचा पैशांसाठी खून,तीन अल्पवयीन मुले जेरबंद; देहूरोड येथील घटना

धक्कादायक! मुंबईकडे पायी निघालेल्याचा पैशांसाठी खून,तीन अल्पवयीन मुले जेरबंद; देहूरोड येथील घटना

Next
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाची कामगिरी

पिंपरी : लॉकडाऊनमुळे अडकून पडल्याने पैसे संपले. त्यामुळे सोलापूर येथून मुंबईकडे चालत जाण्याची एकावर वेळ आली. देहूरोड येथे रस्त्यात झोपला असताना तीन अल्पवयीन मुलांनी त्याचा पैशांसाठी खून केला. बेवारस मृतदेहाची कपड्यांच्या टेलर टॅगवरून ओळख पटली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगात फिरून तीन अल्पवयीन मुलांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले. 
दत्तात्रय कृष्णाजी माचर्ला (वय ४१, रा. शांतीनगर, भिवंडी, मूळ रा. इंद्रा वसाहत, भवानी पेठ, घोडगेवस्ती, सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड रेल्वे स्टेशन जवळील पुलावर दि. ८ जून रोजी बेवारस मृतदेह आढळला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. कपड्यांच्या टेलर टॅगवरून भिवंडी येथील टेलरकडे पोलिसांनी चौकशी केली. सदरचा मृतदेह दत्तात्रय माचर्ला यांचा असल्याचे समोर आले. लॉकडाऊनमुळे ते सोलापूर येथे अडकले होते. पैसे संपल्याने ते सोलापूर येथून मुंबईकडे पायी निघाले. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथे भक्ती-शक्ती चौकात तीन अल्पवयीन मुले व त्यांची भेट झाली. ते बोलत पायी जात असताना एका अल्पवयीन मुलाने माचर्ला यांच्याकडे पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अल्पवयीन मुलांना राग आला. देहूरोड येथे पुलावर पदपथावर माचर्ला झोपले असताना अल्पवयीन मुलांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात माचर्ला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलांनी माचर्ला यांच्याकडील पैसे व मोबाइल घेऊन तेथून पळ काढला. 

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा शोध घेतला. त्यासाठी गुन्हे शाखा युनिट पाचच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आठवडाभर पुणे, मुंबई, सोलापूर, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा असा अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केला. आरोपी तेलंगणा राज्यातील विजयवाडा, हैद्राबाद व रंगारेड्डी अशा वेगवेगळ्या भागातील आहेत. यापूर्वी ते चाईल्ड होम, हैद्राबाद व मुंबई येथे राहण्यास होते. त्यांची तेथे ओळख होऊन मैत्री झाली. यातील आरोपी व मयत माचर्ला यांचा कोणताही सुतराम संबंध नव्हता. केवळ रस्त्याने पायी जात असताना निगडी येथे त्यांचा एकमेकांशी संपर्क झाला.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, भरत माने, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली. वडाळ्यातील टीटी मार्ग पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अजित बिराजदार, पोलीस कर्मचारी राजकिरण बिलासकर, भूषण भोसले व सागर पाटोळे यांनी सहकार्य केले.

...............................

कोरोनाबाधित आढळलेल्या झोपडपट्टीत शोधमोहीम
गुन्हे शाखा, युनिट पाचकडील दोन पथके मुंबई येथे रवाना झाल्या व एक पथक देहूरोड परिसरात तपास करीत होते. तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींनी वडाळा, मुंबई परिसरातील काही व्यक्तींशी संपर्क ठेवला असल्याचे तपासामध्ये समोर आले. त्यावरुन कमलानगर झोपडपट्टी वडाळा येथे त्या व्यक्तींचा शोध घेतला. या झोपडपट्टीमध्ये अडीच हजारावर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तरीही पोलिसांनी न डगमगता खबरदारी घेत आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबविली.

Web Title: Murdered of person for money who going foot to Mumbai due to lockdown; Three minors arrested in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.