नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:00 IST2020-01-09T00:58:42+5:302020-01-09T01:00:30+5:30
अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम संबंधात अडसर ठरल्यामुळे तरुणाने आपल्या मित्राचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री वाठोडात घडली आहे.

नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम संबंधात अडसर ठरल्यामुळे तरुणाने आपल्या मित्राचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री वाठोडात घडली आहे. आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे पोलीस आरोपीची माहिती देणे टाळत आहेत.
आरोपी विकास नागोसे आहे. मंगळवारी रात्री गंगा सेलिब्रेशनजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. रात्री उशिरा त्याची ओळख पटली. तो अनमोलनगर येथील रहिवासी हिमांशु मनोहर डेंगे (२२) आहे. तो हिमांशु कुलर कंपनीत काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आईवडिल आणि लहान भाऊ आहे. विकास वाठोडात राहतो. तो मजुरी करतो. त्याची काही दिवसांपूर्वी हिमांशु सोबत मैत्री झाली. त्याची हिमांशुच्या घरी ये-जा होती. परिसरात एक १५ वर्षाची विद्यार्थिनी राहते. तिची हिमांशुसोबत ओळख होती. विद्यार्थिनीनुसार ती हिमांशुला आपला मानत होती. दरम्यान विकासची नजर या विद्यार्थिनीवर गेली. त्याने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद न दिल्यावरही तो तिच्या मागे लागला होता. तिने ही बाब हिमांशुला सांगितली. हिमांशुने विकासला तिच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे विकासला विद्यार्थिनी आणि हिमांशुचे संबंध असल्याची शंका आली. त्याने दोन-तीन वेळा हिमांशुसोबत वाद घातला. मंगळवारी रात्री ८.३० वाजता गंगा सेलिब्रेशनच्या समोर दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान विकासने हिमांशुचा खून केला. खुनानंतर तो मध्य प्रदेशात निघून गेला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात पाठविण्यात आले. आरोपी हाती लागल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. विद्यार्थिनी आणि हिमांशुच्या कुटुंबीयांची चौकशी केली असता एकतर्फी प्रेमात विद्यार्थिनीपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्यामुळे हिमांशुचा विकासने खून केल्याचा संशय आहे. वाठोडा पोलीस रात्री उशिरापर्यंत विकासचा शोध घेत होते.