उल्हासनगरात खुनाचे सत्र सुरूच, एका आठवड्यात तीन हत्या, परिसरात खळबळ अन् घबराट
By सदानंद नाईक | Updated: October 29, 2024 13:10 IST2024-10-29T12:59:40+5:302024-10-29T13:10:45+5:30
एका आठवड्यात खुनाचे तीन प्रकार झाले असल्याने पोलीस यंत्रणेविरोधात संताप व्यक्त होत आहे

उल्हासनगरात खुनाचे सत्र सुरूच, एका आठवड्यात तीन हत्या, परिसरात खळबळ अन् घबराट
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: कॅम्प नं-३ सी ब्लॉक येथील सेंच्युरी कंपनीच्या मैदानावर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ४ ते ५ जणांच्या टोळक्याने अजय चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन हत्या केली. एकाच आठवड्यातील ही तिसरी हत्या आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरात ऐन दिवाळीपूर्वी एका आठवड्यात तीन हत्येचे प्रकार घडले. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता सी ब्लॉक येथील सेंच्युरी कंपनीच्या मैदानात ४ ते ५ जणांच्या टोळक्याने तलवारीसारख्या धारदार शस्त्राने अजय चव्हाण या तरुणावर अज्ञात कारणावरून हल्ला केला. या हल्ल्यात अजय चव्हाण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीच्या मार्गावर आहे. रविवारी पहाटे काजल पेट्रोल पंप येथे मित्राने खाण्याच्या वादातून राजा इब्राहिम शेख याचा दगड डोक्यावर मारून खून केला. तर त्यापूर्वी एका व्यापाऱ्याचा जुन्या रागातून धारदार शस्त्राने खून केल्याचा प्रकार उघड झाला. एका आठवड्यात खुनाचे तीन प्रकार झाले असून गुन्ह्यात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.