भुसावळ (जि. जळगाव) : भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील अयान कॉलनी येथे कौटुंबिक वाद चिघळून पतीने पत्नीच्या मामाचा खून केला, तर पत्नीच्या वडिलांवरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार, दि. १२ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा. कंडारी, ता. भुसावळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संबंधित महिलेचे वडील शेख जमील शेख शकूर (५२, रा. धुळे) हे जखमी आहेत. सुभान शेख भिकन कुरेशी (रा. अयान कॉलनी, भुसावळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.सुभान शेख व पत्नी सईदा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी घर सोडून गेल्यानंतर वाद मिटविण्यासाठी शुक्रवारी रात्री नातेवाइकांची बैठक झाली. त्यात वाद चिघळून सुभान शेखने पत्नीचा मामा समद शेख व सासरा शेख जमील यांच्यावरही वार केले. दोन्ही जखमींना तातडीने भुसावळ ग्रामीण रुग्णालय व पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी समद शेख यांना मृत घोषित केले, तर शेख जमील यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पती-पत्नीच्या वादामध्ये मध्यस्थी करणाऱ्या मामाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 02:26 IST