उल्हासनगर : शहरातील साईनाथ परिसरातील एका ठिकाणी हाफिज शेख यांनी काही तरुणांना गांजा पिण्यास मनाई केली. या रागातून नशेखोरांनी हाफीज यांना मारहाण करून त्यांचे डोके विजेच्या खांबाला आपटले. यातच हाफीज यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ परिसरातील साईनाथ कॉलनी येथील एका जागी सोनूसह अन्य काही जण मंगळवारी सकाळी ११.३० वाजता गांजा पित होते. यावेळी हाफीज यांनी नशेखोर तरुणांना गांजा पिण्यास मनाई केली. या गोष्टीचा राग आल्याने सोनूसह अन्य जणांनी हाफीज यांना जबर मारहाण केली, तसेच त्यांचे डोके खांबावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी हिललाइन पोलिसांनी सोनू याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कदम यांनी अवघ्या ४०० रुपयांच्या उधारीच्या भांडणातून खून झाल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
विजेच्या खांबावर डोके आपटून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 02:06 IST