सात रात्री भिकाऱ्यांच्या अवतीभोवती घालवत हत्याकांडाचा उलगडा; जुईनगरमधील हत्येचा १० दिवसांनी छडा
By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 18, 2025 12:44 IST2025-12-18T12:44:15+5:302025-12-18T12:44:40+5:30
नवी मुंबई पोलिसांनी सात रात्री भिकारी, भंगार गोळा करणाऱ्यांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्याच्या अवतीभोवती घालवली आणि भंगार गोळा करणाऱ्याच्या हत्येचा उलगडा केला.

सात रात्री भिकाऱ्यांच्या अवतीभोवती घालवत हत्याकांडाचा उलगडा; जुईनगरमधील हत्येचा १० दिवसांनी छडा
सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई पोलिसांनी सात रात्री भिकारी, भंगार गोळा करणाऱ्यांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्याच्या अवतीभोवती घालवली आणि भंगार गोळा करणाऱ्याच्या हत्येचा उलगडा केला. तपासादरम्यान दारुड्यांना पाजलेली दारू पोलिसांना तपासासाठी दिशा ठरली आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाला यश आले.
जुईनगर रेल्वेस्थानकाबाहेर २० नोव्हेंबरला एक मृतदेह आढळला. मृत व्यक्त्ती व्यसनी, भंगार गोळा करणारा असून त्याच्या डोक्यावर घाव असल्याचे पोलिसांना अल्पावधीतच उमजले. मात्र, प्रथमदर्शी बाबींवरून त्याच्या अकस्मात मृत्यूची नेरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. घटना घडल्यानंतर दहा दिवसांनीही गुन्ह्याचा काहीच छडा लागत नसल्याने हे प्रकरण सहायक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाकडे तपासासाठी सोपविण्यात आले.
तपासादरम्यान सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बनकर, उपनिरीक्षक अभय काकड यांनी जुईनगर स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी तपास सुरू केला. पोलिसांनी व्यसनींसोबत जवळीक साधली. दारूड्यांसोबत जमलेल्या गट्टीतून थेट मारेकरूचीच माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पत्नीशी गैरवर्तन केल्याचा बदला
कादिर शेख (२५) हा मानखुर्दचा राहणारा असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तो रात्री भंगार, दारूच्या बाटल्या गोळा करण्यासाठी जुईनगर स्थानक परिसरात यायचा. मात्र, यावेळी तो तिथल्या देहविक्री करणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्यासह रात्री प्रवास करणाऱ्यांना धमकावून पैसे लुटायचा. जुईनगर स्थानकालगत झोपडीत राहणाऱ्या राजू मंडलच्या पत्नीसोबत गैरवर्तन केले होते. त्यातून आपण कादिरची हत्या करणार असल्याचे राजूने त्या दारूड्यांसमोर बोलून दाखवले होते. याच दारुड्याला पोलिसांनी घोटभर पाजून बोलते केल्याने त्याने पोटातले गुपित ओठावर आणले. त्यासाठी पोलिसांना सात रात्री केवळ जुईनगर परिसरात धिरक्या घालत फिरावे लागले. अन्यथा इतर काही उकल न झालेल्या गुन्ह्यांप्रमाणे हा गुन्हादेखील एडीआर म्हणूनच पोलिस दप्तरी पडून राहिला असता.