धाडीमध्ये सहा कोटी घेतल्याच्या आरोपामुळे मुंब्रा पोलीस वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 07:26 AM2022-05-10T07:26:11+5:302022-05-10T07:26:23+5:30

पोलीस उपायुक्तांमार्फत होणार चौकशी : सहपोलीस आयुक्तांनी दिले आदेश

Mumbra police in controversy over allegations of taking Rs 6 crore in a raid | धाडीमध्ये सहा कोटी घेतल्याच्या आरोपामुळे मुंब्रा पोलीस वादात

धाडीमध्ये सहा कोटी घेतल्याच्या आरोपामुळे मुंब्रा पोलीस वादात

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्रा पोलिसांवर तब्बल सहा कोटी रुपये वसुलीच्या आरोपाचे पत्रच व्हायरल झाल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

ठाण्याचे  पोलीस आयुक्त जयजित सिंग तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिलेले संबंधित तक्रारदाराचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रानुसार  १२ एप्रिल २०२२ रोजी रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीतराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक शेवाळे, काळे आणि मदने तसेच अन्य तीन खासगी व्यक्ती यांनी पोलीस व्हॅनमधून मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमधील फैजल मेमन यांच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले. या छाप्यात मेमन यांच्या घरात ३० कोटी रुपयांची कथित रोकड सापडली. प्रत्येकी एक  कोटीप्रमाणे ३०  बॉक्समध्ये हे ३० कोटी रुपये बांधले होते. इतकी मोठी रोकड घरात आढळल्यामुळे हा  काळा पैसा असून, तुझ्यावर छापा पडेल, तो सर्व पैसा जप्त होईल, अशी भीती उपस्थित अधिकाऱ्यांनी मेमन यांना दाखविली. त्यानंतर हे सर्व पैसे जप्त करून मुंब्रा पोलीस ठाण्यात नेले गेले. 

मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या  दालनातच ३० कोटींचे ३० बॉक्स ठेवल्याचा आरोप आहे.  तिथे मेमन यांना घेऊन गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी  त्यांना धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलिसांच्या दबावाला बळी पडून मेमन दोन कोटींवर तयार झाले. त्यावर दोन कोटी घेतो, उर्वरित परत करतो, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात दोनऐवजी सहा कोटी रुपये काढले. उर्वरित २४ कोटी मेमन यांना परत करण्यात आले. एवढे पैसे का घेतले, असे मेमन यांनी विचारण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना लाथा मारून बाहेर काढल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार
याबाबत ठाणे पोलिसांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू केली असून, मुंब्रा पोलीस ठाण्यातील १२ एप्रिल रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.  दरम्यान, या व्हायरल पत्रात थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांचेही नाव आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे पत्र व्हायरल करणारा कोण आहे, हेच समजले नसून हा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगत, कडलग यांनी हा एकूण प्रकारच हास्यास्पद असल्याचा दावा केला.

या संपूर्ण प्रकरणाची पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी होईल. तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई होईल.
- दत्तात्रय कराळे, 
सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर

Web Title: Mumbra police in controversy over allegations of taking Rs 6 crore in a raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस