Aryan Khan Drugs Case: एनसीबी तपासणार आर्यनचे बँक व्यवहार, इतर सात जणांच्या व्यवहाराची पडताळणी; ड्रग्जसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:56 AM2021-10-24T06:56:09+5:302021-10-24T06:57:54+5:30

Aryan Khan Drugs Case: मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला एनसीबीने छापा टाकला.

Mumbai Drug Bust Updates: Bank details of Aryan Khan along with other accused under lens | Aryan Khan Drugs Case: एनसीबी तपासणार आर्यनचे बँक व्यवहार, इतर सात जणांच्या व्यवहाराची पडताळणी; ड्रग्जसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा संशय 

Aryan Khan Drugs Case: एनसीबी तपासणार आर्यनचे बँक व्यवहार, इतर सात जणांच्या व्यवहाराची पडताळणी; ड्रग्जसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा संशय 

googlenewsNext

मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून एनसीबीची कोठडी आणि आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या आर्यन खान व अन्य सात जणांच्या विविध बँक खात्यांवरील व्यवहाराची तपासणी केली जात आहे. ड्रग्ज मागविण्यासाठी त्यांच्या खात्यावरून काही व्यवहार झाले आहेत का, याची पडताळणी करण्यात येत असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला एनसीबीने छापा टाकला. त्यामध्ये आर्यन खानसह मूनमून धमेचा, नूपुर सारिका, अरबाज  मर्चंट, इस्मित सिंह, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर व गोमीत चोप्रा यांना अटक करण्यात आली. हे सर्व जण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचे  ड्रग्ज तस्कर व इतरांशी असलेल्या संबंधाबाबत तपास सुरू आहे. त्यांनी या पार्टीसाठी तसेच यापूर्वीही तस्करांकडून अमली पदार्थ मागितले होते का, त्यासाठी रकमेची पूर्तता कशी केली, ही माहिती घेण्यासाठी त्यांची बँक खाती तपासली जात आहेत.

देशात व परदेशात त्यांनी केलेल्या व्यवहाराची माहिती संबंधित बँकेकडून एनसीबी घेत असल्याचे सांगण्यात आले.  एनसीबीने या प्रकरणी आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे, तर क्रूझवरील छाप्यातून   २२ एमडी, एम ए टेब्लेटस, १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस  आणि १.३३ लाखांची रोकड जप्त केली आहे.

पश्चिम उपनगरात एनसीबीची शोधमोहीम सुरूच
देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या तपासाच्या अनुषंगाने एनसीबीची शोधमोहीम सुरूच आहे. अभिनेत्री अन्यन्या पांडे चौकशीच्या रडारवर असताना अटक केलेल्या तरुण-तरुणीच्या संपर्कात असलेल्या तस्कर व दलालांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी पश्चिम उपनगरात मालाड, वांद्रे व अंधेरी या ठिकाणी छापे टाकून काहींना ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र त्याबाबत भाष्य करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
क्रूझवरील पार्टीच्या संबंधाने एनसीबीने केलेल्या चौकशीतून आणखी काही सेलिब्रेटींची नावे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासंबंधी एनसीबीने मालाडमध्ये शुक्रवारी एका तस्कराला ताब्यात घेतले होते. त्याला आजही चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्याच्याकडून काही ‘बडी’ नावे  उघड होण्याची शक्यता आहे.

शाहरूखच्या मॅनेजरकडून आर्यनसंबंधी कागदपत्रे एनसीबीला सादर
बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने शनिवारी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी)  कार्यालयात सुमारे तासभर हजेरी लावली. यावेळी तिने आर्यन खानसंबंधी हवी असलेली कागदपत्रे तपास यंत्रणेकडे सुपूर्द केली आहेत.
कार्डेलिया क्रूझवरील छाप्यांबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खान  याच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत सखोल तपास सुरू ठेवला आहे. त्यासाठी पथकाने गुरुवारी त्याच्या मन्नत निवासस्थानी जाऊन नोटीस बजावली होती. आर्यनचे परदेशातील वास्तव्य, शैक्षणिक आणि त्याने गेल्या काही महिन्यांत घेतलेल्या औषधांसंबंधीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्याबाबतची नेमकी माहिती घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी शाहरूख खानचा बॉडीगार्ड एनसीबीच्या कार्यालयात पोहोचला होता. त्याला त्याबाबत समजावून सांगितल्यानंतर शनिवारी सकाळी शाहरूखची मॅनेजर पूजा ही संबंधित कागदपत्रांची फाइल घेऊन कार्यालयात पोहोचली. तिच्याकडून सर्व कागदपत्रांची शहानिशा करून तिचा जबाब घेण्यात आला. आर्यन हा आर्थर जेलमध्ये असून त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याच्या जामीनअर्जावर येत्या मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Web Title: Mumbai Drug Bust Updates: Bank details of Aryan Khan along with other accused under lens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.