मुलुंडच्या व्यापाऱ्याला चुलत भावानेच केली जबर मारहाण; पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: May 25, 2023 23:55 IST2023-05-25T23:54:53+5:302023-05-25T23:55:13+5:30
पाच जणांविरुद्ध मारहाणीसह धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दिली.

मुलुंडच्या व्यापाऱ्याला चुलत भावानेच केली जबर मारहाण; पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे: आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच चुलत भाऊ ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया आणि अन्य दोन अशा पाच जणांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेऊन जबर मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
पाच जणांविरुद्ध मारहाणीसह धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दिली.यातील तक्रारदार बिपीन यांना २२ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कॅडबरी कपंनीजवळील सायकल स्टॅन्ड येथून रसिक बोरीचा यांनी संगनमत करुन एका मोटारीमध्ये जबरदस्तीने बसवून येऊर येथील बंगल्यावर नेले. त्यानंतर बिपीन यांचा शर्ट व पँट जबरदस्तीने काढून बोरीचा यांच्यासह पाच जणांनी शिवीगाळ करीत लाकडी बांबू तसेच लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली.
ठार मारण्याची धमकी देऊन त्यांची मोटार स्वत:कडे ठेवून घेतली. प्रचंड भेदरलेल्या बिपीन यांनी २५ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.