MP Crime: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात शुक्रवारी एक हादरवणारी घटना घडली. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील रूप सिंग स्टेडियम रोडवर नंदिनी नावाच्या महिलेची लिव्ह-इन पार्टनर अरविंद परिहारने गोळ्या घालून हत्या केली. आरोपी अरविंदने देशी बनावटीच्या पिस्तूलातून तिच्या डोक्यात चार गोळ्या झाडल्या. हत्येनंतर तो त्याच्या नंदीनीच्या मृतदेहाजवळ बसून होता. यादरम्यान त्याने पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर पोलिसांनी अरविंदला ताब्यात घेतलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
अरविंद सिंह परिहारने नंदिनी केवटवर गोळ्या झाडून तिची भररस्त्यात हत्या केली. आरोपी अरविंद आधीच विवाहित आहे आणि त्याने मंदिरात नंदिनीशी दुसरे लग्न केले होते. गोळ्या झाडताना आरोपी फेसबुकवर लाईव्ह होता. नंदिनीचा जागीच मृत्यू झाला, तर पोलिसांनी धाडस दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. पण, अरविंदने नंदिनीला मारण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. १० महिन्यांपूर्वीही त्याने एक प्राणघातक हल्ला केला होता पण सुदैवाने नंदिनी बचावली होती.
आरोपी अरविंद परिहारने ३१५ बोरच्या पिस्तूलमधून पत्नी नंदिनी केवटवर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी चार नंदिनीला लागल्या आणि एक रस्त्यावर पडली. यादरम्यान अरविंदने फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले. "भावांनो, तिने (नंदिनीने) तिचा प्रियकर अंकुश पाठक आणि कल्लू यांच्या सांगण्यावरून माझ्याविरुद्ध खोटा खटला दाखल केला. ही महिला खूप खोटारडी आहे. मी माझ्या मुलांची शपथ घेतो की तिने खोटा खटला दाखल केला. ती अनेक मुलांसोबत हॉटेलमध्ये राहिली आहे," असं अरविंदने म्हटलं.
शुक्रवारी दुपारी १:३० वाजता ग्वाल्हेरमधील रूप सिंग क्रिकेट स्टेडियमजवळील वर्दळीच्या रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली. अरविंद परिहारने नंदिनी केवटला वाटेत थांबवले आणि पाच गोळ्या झाडल्या. चार गोळ्या नंदिनी यांच्या चेहऱ्यावर आणि छातीवर लागल्या. ज्यामुळे ती रस्त्यावर कोसळली आणि वेदनेने विव्हळू लागली. नंदिनीवर गोळी झाडल्यानंतर, अरविंद हातात पिस्तूल घेऊन रस्त्यावर बसला. गोळीबाराच्या भीतीमुळे लोक आणि पोलीस त्याच्या जवळ जाऊ शकले नाहीत. अरविंद वारंवार पिस्तूल दाखवून लोकांना दूर राहण्याची धमकी देत होता. त्यावेळी पोलिसांनी कार्बाइनमधून गोळीबार करून त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्बाइन अयशस्वी झाली. यानंतर, पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.
अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्यानंतर अरविंद थोडासा अस्वस्थ झाला आणि परिस्थितीचा फायदा घेत पोलिसांनी त्याला पकडले आणि बेदम चोप दिला. पोलीस तपासातून नंदिनी केवटचे पाचवे रिलेशन असल्याचे समोर आले. झाशीतील चिरगाव येथील नंदिनीचे पहिले लग्न १० वर्षांपूर्वी दतिया येथील लांच गावातील गोटीराम केवटशी झाले होते. या लग्नापासून तिला एक मूल आहे, जे झाशीमध्ये त्याच्या आजोबांसोबत राहतो. लग्नानंतर नंदिनीचे तिच्या पतीचे मित्र छोटू केवट, निमलेश सेन आणि फिरोज खान यांच्याशी अवैध संबंध होते. नंदिनीने तिच्या चौथ्या प्रियकरासह २०१७ मध्ये दतिया येथे तिचा तिसरा प्रियकर निमलेश सेन याची हत्या केली होती. या प्रकरणात ती ४ वर्षे ६ महिने तुरुंगात राहिली आणि २०२२ मध्ये सुटका झाल्यानंतर ती ग्वाल्हेरला आली. तिथे तिने ब्युटी पार्लर उघडले.
२०२२ मध्ये नंदिनीची भेट कंत्राटदार अरविंद परिहारशी झाली. दोघांचे प्रेम जुळलं आणि २०२३ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला. अरविंदचे हे तिसरे लग्न होते. लग्नानंतर दोघांनीही कुटुंबांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. नंदिनीने अरविंदवर अनेक गंभीर आरोप केले आणि तीन गुन्हे दाखल केले.