उत्तर प्रदेशातील इटावा येथे एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने सात वर्षांपूर्वी पतीला सोडून त्याच गावातील दुसऱ्या तरुणाशी लग्न केलं होतं. तेव्हापासूनच मुलगा संतापला होता. यानंतर त्याने आता आपल्या आईला मारण्याचा कट रचला. कौशल शर्मा असं आरोपीचं नाव आहे. २९ वर्षीय कौशल हा खुरियापुरा गावातील रहिवासी आहे. तो त्याचे वडील संजय शर्मा यांच्यासोबत राहत होता.
संजय यांच्या पत्नीने सात वर्षांपूर्वी त्यांना सोडून गावातील रामनिवास शर्माशी लग्न केलं होतं. तेव्हापासून कौशलच्या मनात बदला घ्यायचा होता. कौशलने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या आईच्या या कृत्यामुळे त्याचं लग्न होत नव्हतं. समाजात त्याला तोंड दाखवता येत नव्हतं. म्हणून त्याने त्याच्या आईला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. त्याने आई यशोदाला औषध देण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावलं, नंतर तिला स्कॉर्पिओमध्ये बसवलं.
काही अंतर गेल्यावर आईला गाडीतून उतरवलं आणि त्याच स्कॉर्पिओने तिला चिरडून मारलं. शेवटी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पळून गेला. या प्रकरणाबाबत इटावा एसपी सिटी अभय नाथ त्रिपाठी म्हणाले की, २९ जुलै रोजी बलराई परिसरातील खंडिया पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला. महिलेची ओळख पटल्यानंतर ती आग्राच्या जैतपूर पोलीस ठाण्यातील खुरियापुरा गावातील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. महिलेच्या पतीने हत्येची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कौशल आई यशोदासोबत दिसला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सर्व काही सांगितलं. कौशलने सांगितलं की, त्याचे वडील जिवंत असताना त्याच्या आईने त्यांना फसवलं होतं. त्यामुळे त्यांची बदनामी झाली होती. यामुळे तो लग्नही करू शकला नाही. बदला घेण्याच्या उद्देशाने, तो औषध देण्याच्या बहाण्याने त्याच्या मित्रांसह त्याच्या आईला घेऊन आला आणि नंतर तिची हत्या केली.