गुप्तधनासाठी दिला मायलेकीचा बळी? बेलापुरातील घटनेला नवे वळण
By शिवाजी पवार | Updated: September 21, 2022 16:48 IST2022-09-21T16:47:52+5:302022-09-21T16:48:18+5:30
Crime News : मयत ज्योती यांचे भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे (वय ३५, रा.पिंपळाचा मळा ता.राहुरी) यांनी श्रीरामपूर येथील न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

गुप्तधनासाठी दिला मायलेकीचा बळी? बेलापुरातील घटनेला नवे वळण
श्रीरामपूर : बेलापूर येथे जानेवारी २०२१ मध्ये गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकीच्या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. काही भोंदू बाबांच्या सांगण्यावरून गुप्तधनाच्या लालसेतून या दोघींचा नरबळी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेच्या भावाने याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. बेलापुरात ६ जानेवारीला सकाळी घरामध्ये गॅसचा प्रचंड मोठा स्फोट झाला होता. यात ज्योती शशिकांत शेलार व नऊ वर्षे वयाची मुलगी नमोश्री शशिकांत शेलार या दोघींचा मृत्यू झाला होता. घटनेत शशिकांत शेलार हे जखमी झाले होते. पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मयत ज्योती यांचे भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे (वय ३५, रा.पिंपळाचा मळा ता.राहुरी) यांनी श्रीरामपूर येथील न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. फिर्यादीवरून शशिकांत अशोक शेलार, अशोक ठमाजी शेलार, लिलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाबासाहेब शेलार, पवन बाळासाहेब खरात, काजल किशोर खरात, किशोर सुखदेव खरात, अनिकेत पाटोळे या एकाच कुटुंबातील आरोपींवर तसेच सांगळेबाबा, गागरेबाबा तसेच देवकर गुरू नावाच्या तिघा भोंदूबाबांवर नरबळी तसेच जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोंदूबाबांच्या सांगण्यावरून सर्व आरोपींनी घरात सिलिंडरचा स्फोट घडवून आणला. तो सुनियोजित कटाचा भाग होता. ज्योती व नमोश्री शेलार यांचा गुप्तधनाच्या शोधासाठी बळी देण्याचा यामागे हेतू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये मयत ज्योती हिचा पती शशिकांत हा जखमी झाला होता. त्याच्यावर पत्नी व मुलीसह रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधोपचारासाठी त्यावेळी शेलार कुटुंबीयांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. यात ३ ते ४ लाख रुपये मदत जमा झाली. मात्र आरोपींनी ती मदत स्वत:कडे ठेऊन घेतली, असेही फिर्यादी राजेंद्र नन्नवरे यांचे म्हणणे आहे.