धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर १८ जणांकडून ९ दिवस बलात्कार; राज्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 13:11 IST2021-03-16T13:11:35+5:302021-03-16T13:11:49+5:30
आतापर्यंत पोलिसांकडून २० जणांना अटक; ४ अल्पवयीन आणि एका महिलेचा समावेश

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर १८ जणांकडून ९ दिवस बलात्कार; राज्यात खळबळ
कोटा: राजस्थानच्या हाडौतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कोटा जिल्ह्यातल्या सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. १५ वर्षीय मुलीवर दीड डझनहून अधिक जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नराधमांनी नऊ दिवस मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ४ अल्पवयीन आणि एका महिलेचा समावेश आहे.
नराधम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असताना ती विव्हळत होती, जिवाच्या आकांतानं ओरडत होती. त्यावेळी तिला शांत करण्यासाठी नराधम अमली पदार्थ द्यायचे. याशिवाय तिला मारहाण करायचे. मला घरी जाऊ द्या, अशी विनंती पीडित तरुणीनं नराधमांकडे वारंवार केली. त्यावेळी तिला चाकू दाखवून धमकावण्यात आलं.
कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी घडला. 'आरोपी चौथमल, बुलबुल उर्फ पूजा जैन पीडितेला बॅग देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून शेजारच्या झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. त्यांनी तिथे तीन-चार मुलांना बोलावलं आणि पीडितेला त्यांच्याकडे सोपवलं. तिला पहिल्या दिवशी गागरोन किल्ल्यावर नेण्यात आलं. त्यानंतर झालावाडमधील एका खोलीत नेलं गेलं. तिथे तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले,' अशी माहिती चौधरींनी दिली.
६ मार्चला पीडितेची पोलीस ठाण्यात धाव
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झालावाड, गागरोनमधील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आरोपींनी पीडितेवर अत्याचार केले. ५ मार्चला आरोपी महिला बुलबुल उर्फ पूजा जैन अल्पवयीन पीडितेला झालावाडमधल्या सुकेतमध्ये घेऊन आली. पीडितेनं तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर ६ मार्चला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.