मुरादाबादच्या बिलारी पोलीस स्टेशन परिसरातील आरीखेडा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तीन वर्षांच्या मुलीने तिच्या आईचा मृत्यू कसा झाला हे सांगितलं आहे. पप्पांनीच आधी मम्मीला काठीने मारहाण केली आणि नंतर तिला पंख्याला लटकवलं असं सांगितलं आहे.
रविवारी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की निशा नावाची एक महिला पंख्याला लटकलेली आढळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली घेतला, पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेच्या नातेवाईकांनी पती अरविंदवर हत्येचा आरोप केला आहे.
घटनेची माहिती मिळताच एसपी क्राईम आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, निशाचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तिच्या पतीला दारूचं व्यसन होतं. घटनेपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. पतीने रात्री ३ वाजता पत्नी पंख्याला लटकलेली आढळली असं खोटं सांगितलं.
एसपी क्राईम सुभाष चंद्र गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. आतापर्यंत कुटुंबाकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही, तक्रार मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.
या संपूर्ण प्रकरणात निष्पाप मुलीने थेट तिच्या वडिलांवर आरोप केले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जाईल आणि मुलीचा जबाब देखील गांभीर्याने घेतला जाईल असे पोलिसांनी म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.