- नरेश डोंगरे
नागपूर : गेल्या आठवड्यात रहस्यमयरित्या आढळलेल्या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. रोशन गिरिपुंजे (वय ३६) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता झाल्यानंतर त्याचे लास्ट लोकेशन मध्य प्रदेशात आढळल्याने पोलीस तिकडे शोधाशोध करीत होते. आज त्याचा गळफास लावलेला मृतदेह नागपूर-उमरेड मार्गावर विहिरगावजवळ आढळल्याने घातपाताचा संशय बळावला आहे.
रेल्वे पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात कार्यरत असलेला रोशन गिरिपुंजे पत्नी आणि मुलीसह अजनीत भाड्याच्या घरात राहत होता. शनिवारी ७ डिसेंबरला दिवसभर ड्युटी केल्यानंतर सायंकाळी तो कार्यालयातून बाहेर पडला त्यानंतर बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे अजनी पोलीस आणि रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता.
शनिवारी ७ डिसेंबरच्या रात्री त्याच्या मोबाईलचे लोकेशन जबलपूर (मध्य प्रदेश) मध्ये आढळल्याने रेल्वे पोलिसांचे पथक जबलपूरला 'त्या' लोकेशनवर पोहोचले होते. मात्र, तेथे रोशन आढळला नाही. त्यामुळे त्याचा नागपूरसह तिकडेही शोध घेतला जात होता. दरम्यान, आज दुपारी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडवाणी धाब्याजवळ एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांना आणि रोशनच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. रोशनची पल्सर दुचाकी (एमएच ३६/ एसी ४६५२) बाजुला पडून होती.
जबलपूरहून परतला कधी अन् ...?७ डिसेंबरच्या रात्री रोशन जबलपूरला गेल्याचे मोबाईल लोकेशनवरून स्पष्ट होत असले तरी तो एवढे दिवस कुठे होता आणि त्याने आत्महत्येसाठी कुहीजवळचे निर्जन ठिकाणी कसे निवडले, त्याने त्याचा मोबाईल बंद करून का ठेवला, असे अनेक प्रश्न पोलिसांना सतावत आहेत. रोशनच्या कपड्यात कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे त्याने खरेच आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे आणि आत्महत्या केली तर कोणत्या कारणाने, आदी प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.