अमरावतीत अल्पवयीन तरूणाचा शस्त्राने भोसकून खून; झुडूपात फेकला मृतदेह
By प्रदीप भाकरे | Updated: October 21, 2024 22:35 IST2024-10-21T22:35:20+5:302024-10-21T22:35:20+5:30
साहिलला वडिल नसून, त्याने याचवर्षी दहावी उत्तीर्ण केली होती, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयात एकत्र आलेल्या त्याच्या समवयस्कांनी दिली.

अमरावतीत अल्पवयीन तरूणाचा शस्त्राने भोसकून खून; झुडूपात फेकला मृतदेह
अमरावती: खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडगडेश्वर मंदिरामागील परिसरात एका अल्पवयीन तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. साहिल मनीष पंजाबी उर्फ चोपडा (१७, रा. अंबा काॅलनी, रविनगरजवळ, अमरावती) असे मृताचे नाव असल्याची माहिती खोलापुरी गेट पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
साहिलचा मृतदेह गडगडेश्वर परिसरातील मंदिरामागे रक्तबंबाळ अवस्थेत पडून आहे, तर बाजुला एक रक्ताने माखलेला चाकू पडून असल्याची माहिती एका स्थानिकाने खोलापुरी गेट पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तथा चाकुदेखील जप्त केला. पोलिसांनुसार, साहिलच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार असून, अज्ञात आरोपींनी त्याच्यावर वार करून त्याचा मृतदेह गडगडेश्वर मंदिराच्या मागील बाजुच्या झुडूपात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
साहिलला वडिल नसून, त्याने याचवर्षी दहावी उत्तीर्ण केली होती, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयात एकत्र आलेल्या त्याच्या समवयस्कांनी दिली. पोलीस प्रशासन अद्यापपर्यंत घटनास्थळीच असून, याप्रकरणी उशिरा रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, साहिलचा खून हा पुर्ववैमनस्यातून झाला असावा, ही शक्यता लक्षात घेता खोलापुरी गेट पोलिसांसह गुन्हे शाखा, सीआययू पथकाने आरोपींची शोधमोहिम चालविली आहे. ६ ऑक्टोबरपासूनची ही हत्येची सातवी घटना ठरली आहे. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर यांच्यासह क्राईमच्या तीनही टिम घटनास्थळी आहेत.