आई-वडील नशा मुक्ती केंद्रात पाठवणार होते; कुऱ्हाडीनं वार करत मुलानं दोघांना संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:40 IST2021-12-17T17:39:51+5:302021-12-17T17:40:15+5:30
पोलिसांनी अल्पवयीन मुलाला केली अटक; प्रकरणाचा तपास सुरू

आई-वडील नशा मुक्ती केंद्रात पाठवणार होते; कुऱ्हाडीनं वार करत मुलानं दोघांना संपवले
जयपूर: राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका १६ वर्षांच्या मुलानं आई वडिलांचा निर्घृण खून केला आहे. कुऱ्हाडीच्या मदतीनं मुलानं आई वडिलांना संपवलं. आरोपी २ दिवसांपूर्वीच नशामुक्ती केंद्रातून परतला होता. कुटुंबीय त्याला पुन्हा नशा मुक्ती केंद्रात पाठवणार होते. मात्र मुलाचा विरोध होता. त्यावरून त्याचा कुटुंबासोबत वाद झाला.
नोहरमधील फेफाना गावात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलानं त्याच्या आई वडिलांची निर्घृण हत्या केली. आई वडील झोपले असताना आरोपीनं कुऱ्हाडीनं वार केले. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं १४ वर्षांच्या लहान भावाच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे तो जखमी झाला. यानंतर आरोपीनं स्वत: या घटनेची माहिती शेजारच्यांना दिली. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. त्यावेळी लहान भावाचा श्वास सुरू होता. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन आरोपीला अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली. या घटनेनंतर गावात खळबळ माजली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.