संगमनेरातील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By शेखर पानसरे | Updated: July 23, 2023 13:53 IST2023-07-23T13:53:14+5:302023-07-23T13:53:23+5:30
मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले.

संगमनेरातील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संगमनेर शहरातील हॉटेलमध्ये अत्याचार करण्यात आले. शनिवारी (दि.२२) हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश सुखदेव भडांगे (रा. शेंडेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रविवारी (दि.२३) भडांगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शालेय शिक्षण घेते, तिला गणेश भडांगे याने दुचाकीवर बसविले, तो तिला संगमनेर शहरात घेऊन आला. सकाळी १०.३० च्या सुमारास एका हॉटेलात तो तिला घेऊन गेला.
मुलीने त्याला विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भडांगे याला ताब्यात घेतले असून कुठल्या हॉटेलात मुलीवर अत्याचार झाले. याचा पोलिस तपास करत आहेत.घारगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे अधिक तपास करीत आहेत.