नायझेरियनकडून १० लाखाचे मेफेड्रॉन जप्त; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 23:41 IST2023-11-29T23:40:53+5:302023-11-29T23:41:04+5:30
अमली पदार्थ विरोधी पथकाची तळोजात कारवाई

नायझेरियनकडून १० लाखाचे मेफेड्रॉन जप्त; दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क,
नवी मुंबई : ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघा नायझेरियन व्यक्तींना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख ९० हजार रुपये किमतीचे १०९ ग्रॅम मेफेड्रॉन हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
तळोजा मधील पेंधर गावालगत दोन नायझेरियन व्यक्ती ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी पथक तयार केले होते. सहायक निरीक्षक मंदाकिनी चोपडे, सहायक निरीक्षक निलेश धुमाळ, उपनिरीक्षक कुलदीप मोरे, ज्ञानेश्वर बनकर, रमेश तायडे, उत्तम लोखंडे, संजय फुलकर आदींचा त्यामध्ये समावेश होता.
त्यांनी मंगळवारी पेंधर परिसरात सापळा रचला असता दोन नायझेरियन व्यक्ती नजरेस पडल्या. त्यांच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यावेळी अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे १०९ ग्रॅम मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आढळून आला. त्याची किंमत १० लाख ९० हजार रुपये असून विक्रीसाठी हे ड्रग्स घेऊन ते त्याठिकाणी आले होते. जुड जोनाथन आयडोको (३६) व उचे प्रीता इझे (२८) अशी त्यांची नावे असून ते तळोजा येथे राहणारे आहेत. ड्रग्स प्रकरणी त्यांच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा पोलिस अधिक तपास करत आहेत.