धक्कादायक! KGF Chapter 2 पाहणाऱ्या तरुणावर झाडल्या दोन गोळ्या; थिएटरमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 20:15 IST2022-04-21T20:00:30+5:302022-04-21T20:15:53+5:30
चित्रपट सुरू असताना अज्ञातानं तरुण प्रेक्षकावर झाडल्या गोळ्या; सिनेमागृहात एकच धावपळ

धक्कादायक! KGF Chapter 2 पाहणाऱ्या तरुणावर झाडल्या दोन गोळ्या; थिएटरमध्ये खळबळ
कन्नड चित्रपट 'केजीएफ चॅप्टर २'नं जगभरात धुमाकूळ घातला आहे. अभिनेता यशच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. यशचे चाहते चित्रपटगृहांमध्ये जाऊन 'केजीएफ चॅप्टर २' पाहत आहेत. चित्रपटाला प्रचंड यश मिळत असताना कर्नाटकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
हावेरीतील राजश्री चित्रपटगृहात KGF Chapter 2 पाहण्यासाठी गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीनं दोन गोळ्या झाडल्या. सिनेमा सुरू असताना गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवानं त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाही.
रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुण मुगली गावचा रहिवासी असून त्याचं नाव वसंत कुमार आहे. वसंत त्याच्या मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेला होता. तिथे दोन जणांसोबत त्याचा वाद झाला. तो चित्रपटगृहाच्या नियमांचं पालन करत नव्हता. त्यानं पाय पुढील आसनावर ठेवला होता. त्यामुळे पुढे बसलेल्या व्यक्तीला राग अनावर झाला. तो बाहेर गेला आणि पिस्तुल घेऊन आला. त्यानं वसंतवर दोन गोळ्या झाडल्या.
वसंत शेतात काम करतो. शेतीचं काम आटपून रात्री उशिरा तो मित्रांसह चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. वसंतवर गोळी झाडणारा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीनं एकूण तीन गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पहिली गोळी हवेत झाडण्यात आली. त्यानंतरच्या दोन गोळ्या वसंतवर झाडण्यात आल्या. त्यानंतर चित्रपटगृहात खळबळ माजली आणि प्रेक्षकांची पळापळ सुरू झाली, अशी माहिती त्यानं दिली.