कुपवाडला ३०० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, संशयित आयुब मकानदारसह तिघांना अटक
By घनशाम नवाथे | Updated: February 21, 2024 20:42 IST2024-02-21T20:41:11+5:302024-02-21T20:42:11+5:30
मुख्य संशयित आयुब मकानदार याला २०११ मध्ये केटामाईनचा साठा केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

कुपवाडला ३०० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, संशयित आयुब मकानदारसह तिघांना अटक
घनशाम नवाथे/ लाेकमत न्यूज नेटवर्क, सांगली: पुणे शहर गुन्हे अन्वेषणने मंगळवारी सुमारे २ हजार कोटींचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केल्यानंतर रात्री उशिरा कुपवाडमधील स्वामी मळा येथे छापा टाकला. या छाप्यात १४० किलो एमडी जप्त केले. त्याची बाजारभावातील किंमत सुमारे ३०० कोटी रूपये आहे. पोलिसांनी मुख्य सुत्रधार आयुब अकबरशा मकानदार (वय ४०), साथीदार अक्षय चंद्रकांत तावडे (वय ३०, दोघे रा. बाळकृष्णनगर कुपवाड), जागा मालक रमजान हमीद मुजावर वय ५५ वर्ष राहणार नूर इस्लाम मज्जिद जवळ कुपवाड) या तिघांना अटक केली.
मुख्य संशयित आयुब मकानदार याला २०११ मध्ये केटामाईनचा साठा केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगताना त्याची एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांशी ओळख झाली होती. गतवर्षी मकानदार हा कारागृहाबाहेर आला होता. त्यानंतर त्याने एमडी तस्करीत गुंतला होता. कुपवाडमधील स्वामी मळा येथे मुजावर याच्या जागेतील पत्र्याच्या खोलीत साठा करून ठेवला होता. साथीदार अक्षय तावडे याच्या मदतीने तो तस्करी करत होता.
दरम्यान पुणे गुन्हे अन्वेषणने मंगळवारी शानोरी व कुरकुंभ येथे छापे टाकून सुमारे २ हजार कोटींचे एमडी जप्त केले होते. संशयितांची चौकशी केल्यानंतर कुपवाडमधील आयुब मकानदार याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्रीच पुणे पोलिसांचे पथक दाखल झाले. सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक व कुपवाड पोलिसांच्या मदतीने आयुबला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्वामी मळा येथील खोलीत साठा ठेवल्याची कबुली दिली. बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत कारवाई व चौकशी सुरू होती. कारवाईत १४० किलो एमडी जप्त केले. तिघांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांसह सांगलीचे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.