उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये एका गावात क्षुल्लक कारणावरून समाजकंटकांनी २ तास गोंधळ घातला. लग्नासाठी ब्युटी पार्लरमधून लग्नस्थळी परतत असलेल्या दोन नवरींना कारमधून बाहेर काढलं आणि मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर चिखल फेकला. एवढ्यावरच ते थांबवे नाही. ते लग्नात आले आणि पाहुण्यांना मारहाण केली. वाहनांचं नुकसान केलं.
नवरदेवाच्या वडिलांना काठीने मारून त्यांचं डोकं फोडलं. हा सगळा वाद त्यांच्या बाईकला रस्ता न दिल्यामुळे झाला. या घटनेमुळे लग्न मोडलं. सध्या गावात तणाव आहे. नवरीच्या वडिलांनी १५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तरुणांवर छेडछाड आणि दागिने लुटल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेनंतर, गुंड गावातून पळून गेले. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तसेच दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी रिफायनरी पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात दोन बहिणींचं लग्न होतं. राजस्थानातील डिंग जिल्ह्यातून लग्नाची वरात आली होती. मुलींचे काका टाउनशिपमधील एका ब्युटी पार्लरमधून दोन्ही वधूंना त्यांच्या गाडीतून घेऊन येत होते. रात्री ८ वाजता गावातील रस्त्यावरून जात असताना त्यांचा दोन तरुणांशी वाद झाला. यानंतर तरुणांनी काकांना गाडीतून बाहेर काढलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. नवऱ्या त्यांना वाचवण्यासाठी गाडीतून उतरल्या तेव्हा त्यांनाही मारहाण केली आणि त्यांच्यावर चिखल फेकला.
काही तरुण लग्न असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना मारहाण करू लागले. वाहनांचं नुकसान केलं आणि नवरदेवाच्या वडिलांच्या डोक्यावर काठीने वार केले ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. वाद पाहून मुलाच्या कुटुंबीयांनी संबंध तोडले आणि लग्न मोडले. लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं. माहिती मिळताच, रात्री पोलीस पोहोचले. गावात तणाव असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मुलींच्या वडिलांनी लोकेश, सतीश, शिशुपाल, रोहतास, श्रीपाल उदल, ब्रिजेश, शुभम, पवन, अनिल, अमित आणि गावातील यादव समाजातील अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल केली आणि पाच जणांना ताब्यात घेतलं. याच दरम्यान, एसपी शैलेश कुमार पांडे यांनी सांगितलं की, मुख्य आरोपी रोहतास यादव आणि एकाला अटक करण्यात आली आहे. लवकरच इतर लोकांनाही अटक केली जाईल.