जावयाने रात्री फोन करून 'तुमची मुलगी पळून गेली आहे...' अशी माहिती कुटुंबीयांना दिली. मुलगी घरी येईल याची वाट माहेरचे लोक पाहत होते. पण दुसऱ्या दिवशी अशी बातमी मिळाली की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीचा मृतदेह एका लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत भरून भाजी मंडईत फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली.
बिहारच्या रोहतास जिल्ह्यात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. डेहरी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन भाजी मंडईजवळ एका बेवारस ट्रॉली बॅगेत तरुणीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी भाजी मंडईजवळ एक संशयास्पद ट्रॉली बॅग पाहिली. बॅगेतून उग्र वास येऊ लागल्याने काहीतरी अघटित घडल्याची भीती नागरिकांना वाटली आणि त्यांनी तात्काळ डेहरी नगर पोलिसांना बोलावलं.
सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॉली बॅग उघडली असता त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला.
फॉरेन्सिक टीमनेही (FSL) घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा केले आहेत. रोहतासचे पोलीस अधीक्षक रौशन कुमार यांनी सांगितले की, पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून ही सुटकेस तिथे कोणी आणि कधी ठेवली याचा शोध घेत आहेत.
घटनेच्या सुमारे सहा तासांनंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत तरुणी २५ वर्षीय मैरून खातून असून ती चंदौली जिल्ह्यातील सकलडीहा येथील बटघी गावची रहिवासी होती. तिचा विवाह २०२२ मध्ये डेहरी येथील मोहम्मद क्यामुद्दीन याच्याशी झाला होता. ओळख पटल्यानंतर तिच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली.
तरुणीच्या माहेरच्यांनी पती मोहम्मद क्यामुद्दीन आणि सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, क्यामुद्दीनचे त्याच्या मामीच्या बहिणीशी संबंध होते, ज्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. शनिवारी रात्री क्यामुद्दीनने फोन करून 'मैरून खातून घरातून पळून गेली आहे' असे सांगितले होते. माहेरचे लोक ती घरी येईल याची वाट पाहत होते, पण रविवारी तिच्या मृत्यूची बातमी आली.
Web Summary : Bihar woman's body discovered in a suitcase at a vegetable market after her husband reported her missing. Family suspects foul play, alleging marital discord due to the husband's affair. Police are investigating, reviewing CCTV footage and awaiting forensic reports to determine the cause of death.
Web Summary : बिहार में एक महिला का शव सब्जी मंडी में सूटकेस में मिला, पति ने उसके लापता होने की सूचना दी थी। परिवार को हत्या का संदेह है, पति के विवाहेतर संबंध के कारण वैवाहिक कलह का आरोप लगाया है। पुलिस सीसीटीवी फुटेज की जांच कर रही है और मौत का कारण जानने के लिए फोरेंसिक रिपोर्ट का इंतजार कर रही है।