फेसबुक फ्रेंडने दाखवले लग्नाचे आमिष; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चार वर्षे केलं शोषण
By प्रदीप भाकरे | Updated: December 13, 2023 19:03 IST2023-12-13T19:03:39+5:302023-12-13T19:03:54+5:30
वाच्यता केल्यास कुटुंबाला संपविण्याची धमकी

फेसबुक फ्रेंडने दाखवले लग्नाचे आमिष; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चार वर्षे केलं शोषण
अमरावती: फेसबुक फ्रेंडने लग्नाचे आमिष व अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणाची वाच्यता केल्यास तिच्या कुटुंबीयांना संपविण्याची गर्भित धमकी देण्यात आली. सन २०१९ पासून ती अत्याचाराची मालिका चालली. अखेर त्याचा त्रास अधिकच वाढल्याने पीडिताने १२ डिसेंबर रोजी पोलिस ठाणे गाठले. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपी रवि डांगे (रा. अमरावती) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा फेसबुकवरील मित्र होता. सन २०१७ पासून त्यांच्यात फेसबुक मेसेज व फोन कॉलद्वारे संवाद होता. सन २०१९ मध्ये आरोपी रवि हा फिर्यादी महिलेच्या घरी गेला. आपण फिर्यादी महिलेसोबत लग्न करणार आहोत, असे त्याने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये तो तिच्या घरी आला. घरी कुणी नसल्याची संधी साधत, आता आपण लग्न करणारच आहोत, असे म्हणून तिच्यावर अतिप्रसंग केला.
पाणी डोक्यावरून गेले तेव्हा...
दरम्यान, आरोपी रवि डांगे हा मद्यधुंद राहत असल्याचे समजताच फिर्यादीने त्याच्याशी संवाद कमी केला. ती बोलणे टाळू लागली. त्यानंतर आरोपीने अश्लील फोटो व्हायरल करतो, अशी धमकी देऊन त्याने तिला एका गावात बोलावत तिच्यावर बळजबरी केली. पोलिसांत तक्रार करशील, तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेन, अशी धमकी दिली. मागील काही दिवसांपासून आरोपीचा त्रास अधिकच वाढल्याने तिने पोलिस ठाणे गाठले तथा तक्रार नोंदविली.