मुंबई विमानतळावर १.४५ कोटीचा गांजा जप्त, केरळच्या तरुणास अटक; 'सीमाशुल्क'ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 11:36 IST2025-07-20T11:34:02+5:302025-07-20T11:36:22+5:30
बँकॉक येथून मुंबईत दाखल झालेल्या केरळच्या ३७ वर्षीय तरुणाला गांजाच्या तस्करी प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

मुंबई विमानतळावर १.४५ कोटीचा गांजा जप्त, केरळच्या तरुणास अटक; 'सीमाशुल्क'ची कारवाई
मुंबई : बँकॉक येथून मुंबईत दाखल झालेल्या केरळच्या ३७ वर्षीय तरुणाला गांजाच्या तस्करी प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ कोटी ४५ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. साबिथ मामाऊजी असे या तरुणाचे नाव आहे.
बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या साबिथकडे अमली पदार्थ असल्याची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे मिळाली होती. त्यानुसार तो ज्या विमानाने मुंबईत येणार होता त्या विमानाच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा लावला.
विमान मुंबईत दाखल होताच अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या सामानाची झडती घेतली असता एका बॅगेत सहा बॉक्समध्ये १,४५२ ग्रॅम गांजा आढळला. यासाठी पैसे मिळणार असल्यामुळे ही तस्करी केल्याची कबुली त्याने अधिकाऱ्यांना दिली. साबिथ मामाऊजी याला गांजा कुणी आणण्यास सांगितला होता, याची प्राथमिक माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली असून, त्यानुसार तपास सुरू आहे.