कल्याण - शहरातील नेवाळी भागात एका मराठी तरुणीला परप्रांतीय युवकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर येताच सर्वच स्तरातून यावर संताप होऊ लागला. मनसेने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत जखमी तरुणीची भेट घेतली. ताई, तुझा बदला आम्ही घेऊ. तो जिथे कुठे असेल शोधून काढू असा शब्द मनसेने दिला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस या आरोपीचा शोध घेत होते मात्र पोलिसांना न सापडणारा आरोपी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. नेमका हा आरोपी सापडला कसा याबाबत मनसेचे योगेश गव्हाणे यांनी संपूर्ण घटना सांगितली आहे.
योगेश गव्हाणे हे मनसेचे पदाधिकारी आहेत. ते म्हणाले की, आम्ही नेवाळी नाका इथं जात असताना आम्हाला एक संशयित तरुण दिसला. याच तरुणाने मुलीला मारहाण केली असावी असा संशय आला. आम्ही गाडी बाजूला घेतली त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो आम्हाला बघून पळू लागला. तेव्हा हाच आरोपी आहे हे कळले. आम्ही त्याला पकडले, आमच्या वाहनात टाकले आणि पोलीस स्टेशनला घेऊन आलो. आम्ही ४-५ जण होतो. आरोपीसोबत आमची धरपकड झाली. त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाल्यासारखे दिसून आले. आम्ही आता त्याला पोलिसांना दिलेले आहे. जी काही कायदेशीर कारवाई करायची ते आता पोलीस करतील असं त्यांनी म्हटलं.
तर मारहाण प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ४-५ पथके आरोपीच्या मागावर होत्या. आरोपीचा भाऊ रणजित झा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातून पुढचा तपास सुरू होता. कल्याण पूर्व परिसरात तो असल्याची माहिती होती. त्याचा शोध पोलीस पथके घेत होती. त्याच ठिकाणी काही जागरूक नागरिकाच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले. या प्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेतले आहे. फुटेजमध्ये ज्या इतर महिला दिसत होत्या, त्यांनाही ताब्यात घेतले आहे. २ भावांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीवर याआधी उल्हासनगर, कोळसेवाडी याठिकाणी २ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. एका गुन्ह्यात तो जेलमध्ये होता, जामिनावर तो बाहेर असताना हा गुन्हा त्याने केला आहे अशी माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, मी बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हा इसम अनन्या झा नावाच्या रुग्णाबरोबर आला होता. मी पहिल्यांदाच त्याला इथे पाहिले. तो आतमध्ये जाण्यासाठी खूप घाई करत होता. मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ केल्यानंतर मी ही व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाही आहे, असे आमच्या सरांना सांगितले.. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता, असे पीडित तरुणीने सांगितले