Mansukh Hiren : मनसुख हिरेनप्रकरणी ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पोलीस अधिकारी सुनील माने यांची चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 16:11 IST2021-03-19T14:39:04+5:302021-03-19T16:11:55+5:30
Mansukh Hiren Case : एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

Mansukh Hiren : मनसुख हिरेनप्रकरणी ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पोलीस अधिकारी सुनील माने यांची चौकशी सुरु
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस करत आहे. एटीएस आजवर अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. कांदिवली क्राईम ब्रांच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बोलावलं आहे. एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएस कोर्टात प्रयत्न करणार आहे. तसेच मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसांच्या फोन आला होता आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, मग ते गेले ते घरी परत आलेच नाही. त्यामुळे कांदिवली क्राईम युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची चौकशी केली जात असावी.
रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी असून ते देखील API आहेत. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. तसेच सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांच्या कटाचा पर्दाफाश होऊ शकतो.
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIAने दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती त्यांच्या कार्यालयात आणली. त्यानंतर NIA अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी केली आहे. तपासात NIA ने प्रथम अँटिलीयानजीक सापडलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी सीपी कार्यालयातून ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक काळया रंगाची मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर काल ठाण्यातून प्रॅडो कार जप्त केली. आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.