Mansukh Hiren Death: एटीएसने केला गूढ उलगडल्याचा दावा; तावडे बनून शिंदेंनीच केला कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:40+5:302021-03-22T04:07:00+5:30

मनसुख हिरेन हत्या प्रकरण

Mansukh Hiren Death: ATS claims mystery unraveled; The call was made by Shinde himself | Mansukh Hiren Death: एटीएसने केला गूढ उलगडल्याचा दावा; तावडे बनून शिंदेंनीच केला कॉल

Mansukh Hiren Death: एटीएसने केला गूढ उलगडल्याचा दावा; तावडे बनून शिंदेंनीच केला कॉल

Next

मुंबई / ठाणे : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याच्या आरोपावरून निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे (५१) आणि बुकी रमणिकलाल नरेश गोर (३१) यांना एटीएसने रविवारी अटक केली. मनसुख हिरेन यांचा मृत्यू, त्यांच्या स्कॉर्पिओची चोरी, अँटिलियाजवळ मिळालेली स्फोटके या तिन्ही घटनांचा परस्पर संबंध काय, याचा सखोल तपास आणि त्यासंबंधीचे पुरावेही गोळा करण्यासाठी एटीएसने ठाणे न्यायालयात रविवारी त्यांची कोठडी मागितली. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

मनसुख हत्या प्रकरणाचा तपास सोमवारी एनआयएच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. त्या अगोदर एटीएसच्या  अधिकाऱ्यांनी हे प्रकरण उलगडल्याचा दावा केला. अतिरिक्त    पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांनी मनसुख हत्या प्रकरणाचे गूढ उलगडल्याचे स्पष्ट करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. मात्र मनसुख यांच्या हत्येचे आदेश नेमके कोणी दिले, त्यात सचिन वाझे, विनायक शिंदे आणि रमणिकलाल गोर यांचा परस्परसंबंध काय त्याचा तपशील मात्र एटीएसने उघड केला नाही. त्या तपासासाठीच कोठडी मागितल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता या आरोपींची चौकशी करण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र अर्ज करून न्यायालयाकडून त्यांचा ताबा मिळवावा लागेल. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे आल्यानंतर तब्बल १७ दिवसांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने लखनभैय्या बनावट चकमकीत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला, परंतु मे २०२० पासून पॅरोलवर बाहेर असलेला पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि बुकी रमणिकलाल गोर या दोघांना अटक केली. हा गुन्हा संवेदनशील असल्याने सचिन वाझे यांना या दोघांनी नेमकी काय, कशी मदत केली, हत्या प्रकरणाशी त्यांचा नेमका काय संबंध होता, याचा सखोल तपास करायचा असल्याचे एटीएसने ठाणे न्यायालयात सांगितले. वाझे तसेच अटकेतील दोघा आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा शोध घेऊन ती जप्त करावयाची आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइलचाही शोध घ्यायचा आहे. अटक करण्यात आलेला बुकी नरेश रमणिकलाल गोर (३१) याने वाझे आणि त्याच्या साथीदाराला पाच बेनामी सीमकार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे.

खून नेमका कसा केला?
अटकेतील आरोपींनी हत्येसाठी वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे. तसेच मनसुख यांच्या अंगावरील सोनसाखळी, पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी, मनगटी घड्याळ, मोबाइल फोन, पाकीट आणि पाकिटातील डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची विल्हेवाट कशी लावली, त्याचा शोध घेऊन ते जप्त करणे शिल्लक असल्याचेही एटीएसने सांगितले. आरोपींनी मनसुख यांचा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कुठे केला? खुनाचा कट कुठे रचला, या कटात आणखी कोणी सामील होते का, या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींच्या कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली.

शिंदेनेच केला तावडे म्हणून कॉल
एटीएसने रविवारी अटक केलेला निलंबित पोलीस विनायक शिंदेनेच हत्येपूर्वी मनसुख हिरेन यांना तावड़े म्हणून कॉल केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुकी नरेश गोर याने अहमदाबाद येथून बनावट कागदपत्रांआधारे प्राप्त केलेल्या सिमकार्डचा वापर यासाठी करण्यात आला होता. कांदिवली गुन्हे शाखेच्या तावडे नावाच्या व्यक्तीने केलेल्या कॉलनंतर मनसुख हिरेन घराबाहेर पडले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. एटीएसने अटक केलेला निलंबित पोलीस विनायक शिंदेनेच तावडे नावाने हा कॉल केल्याची माहिती समोर येत आहे. 

मनसुखच्या हत्येची पूर्वतयारी, हत्या, मृतदेहाची विल्हेवाट आणि पुरावे नष्ट करणे यात शिंदेचा सहभाग होता. गोर याने दिलेल्या सिमकार्डद्वारे शिंदेने तावडे नावाने कॉल करून मनसुख यांना ठरलेल्या ठिकाणी बोलावून घेतले. त्या दोघांच्या चौकशीतून यामागील मुख्य हेतू, अन्य आरोपींचा सहभागही स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Mansukh Hiren Death: ATS claims mystery unraveled; The call was made by Shinde himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.