अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास
By धीरज परब | Updated: January 25, 2025 13:18 IST2025-01-25T13:16:06+5:302025-01-25T13:18:37+5:30
मीरारोड भागातील एका ८ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला ठाणे न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास
मीरारोड - मीरारोड भागातील एका ८ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला ठाणे न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन वकील अहमद सगीर हसन शेख ( वय ५६ वर्षे ) याने तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. तिला मारण्याची धमकी देऊन तो सतत तिच्यावर अत्याचार करत होता.
मुलीच्या कुटुंबियांना सदर प्रकार समजल्यावर १० एप्रिल २०२१ रोजी नया नगर पोलीस ठाण्यात पॉक्सो व बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात येऊन शेख ह्याला अटक केली होती . या प्रकरणी तत्कालीन पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपनिरीक्षक सुनील साळुंखे, हवा. निशांत दरेकर यांनी तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले होते.
त्या नंतरचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी, विलास सुपे व आताचे अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव इंगवले यांनी न्यायालयात पैरवी केली. तर सहायक फौजदार सुपडू तडवी, अंमलदार शैलेश साबळे व नीरज घोडेकर यांनी समन्स बजावणी व साक्षीदारांना वेळोवेळी साक्षकामी न्यायालयात हजर ठेवण्यासाठी काम केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ठाणेच्या न्यायाधीश व्हि. एल. भोसले यांनी आरोपी शेख ह्याला दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी अभियोक्ता म्हणून चंदणे यांनी आरोपी विरुद्ध प्रभावी बाजू मांडली. मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त विवेक मुगळीकर यांचे पोलिसांना मार्गदर्शन मिळाले.