Man convicted of killing UK teenager on Goa beach | ब्रिटिश तरुणीच्या मृत्यू प्रकरणी सॅमसन डिसोझा दोषी
ब्रिटिश तरुणीच्या मृत्यू प्रकरणी सॅमसन डिसोझा दोषी

पणजी: ब्रिटिश अल्पवयीन मुलगी स्कार्लेट किलींग बलात्कार व खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आरोपी सॅमसन डिसोझा याला दोषी घोषित केले आहे. त्याच्यावरील सदोष मनुष्य वध आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाला आहे,  तर दुसरा आरोपी प्लासिदो कार्वालो याला निर्दोष घोषित केले आहे. सॅमसनला शुक्रवार दि. १९ रोजी सुनावला जाणार आहे. 

१५ वर्षीय ब्रिटीश युवती स्कार्लेटला ड्रग्स चारले आणि लैंगिक अत्याचर केले तसेच हणजुणे किनाऱ्यावर मरणासन्न अवस्थेत सोडून दिले असे आरोप दोघांवरही ठेवण्यात आले होते. हे आरोप सॅम्सनच्या बाबतीत खरे सिद्ध होवून सदोष मनुष्यवधासाठी त्याला दोषी ठरवण्यात आले, तर प्लासिदोला त्यातून मुक्त करण्यात आले. न्यायमूर्ती आर डी धनुका यांनी हा निवाडा मुंबईहून व्हिडिओ कॉन्स्फरन्सींगच्या माद्यमातून दिला. न्या. धनुका यांच्यासमोर गोव्यात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. परंतु धनुका यांची नंतर मुंबईत बदली झाली होती.  दोषी ठरवण्यात आलेल्या सॅमसनला कोणती  शिक्षा दिली जाते याची आता प्रतीक्षा आहे. 

२३ सप्टेंबर २०१६ रोजी पणजी बाल न्यायालयाने दोघी आरोपींना निर्दोष घोषित करणारा  निवाडा खंडपीठाने एका आरोपीच्या बाबतीत फिरविला आहे. बाल न्यायालयाच्या निवाड्याला सीबीआयकडून खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. खंडपीठात चाललेल्या सुनावणीत सीबीआयतर्फे अ‍ॅड. इजाझ खान यांनी जोरदार युक्तिवाद केले होते. बाल न्यायालयाने या प्रकरणातील महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत असा युक्तिवाद त्यांचा होता. सादर करण्यात आलेले पुरावे गांभीर्याने घेतले नाहीत असा आदेश देण्यात आला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार नाही हा एकमेव मुद्दा विचारात घेऊन संशयितांना निर्दोष घोषित करण्यात आले होते असा दावाही त्यांनी केला होता.

या निवाड्यात पुराव्यांच्या अभावामुळे संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. साक्षीदारांच्या साक्षी न झाल्यामुळे हे प्रकरण कमजोर झाले होते. परंतु खंडपीठाने केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा एकमेव मुद्दा लक्षात न घेता सीबीआयकडून  सादर करण्यात आलेल्या इतर पुरावेही गांभीर्याने घेतले. स्कार्लेटला देण्यात आलेले एलएसडी ड्रग्स, शवविच्छेदन अहवालात त्याला मिळालेली पुष्टी व इतर परिस्थितीजन्य पुरावेही खंडपीठाने गांभिर्याने घेतले. 

खंडपीठात आव्हान दिल्यानंतर अंतिम सुनावणीसाठी १० एप्रिल रोजी  सुरू झाली होती. बाल न्यायालयात चुकीच्या मुद्यांवर आधारीत आरोपी सॅमसन डिसोझा आणि प्लासिदो कार्वालो यांना निर्दोष सोडण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला असून खंडपीठात आव्हान देताना वेगळ्या मुद्यांवर हे प्रकरण लढवण्याचा पवित्रा घेतला होता. स्कार्लेट किलींगचा मृतदेह १८ फेब्रुवारी २००८ रोजी हणजुणे किनाऱ्यावर अर्धनग्न स्थितीत आढळला होता.

Web Title: Man convicted of killing UK teenager on Goa beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.