"साहेब, माझा नवरा रोज तीन तास जिममध्ये व्यायाम करायला लावतो. त्याला माझी फिगर नोरा फतेहीसारखी हवी आहे." असं म्हणत एका महिलेने पोलिसांसमोर हंबरडा फोडला. हे ऐकून पोलीसही थक्क झाले. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये ही अजब घटना उघडकीस आली आहे. महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही, तर तिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा गर्भपातही करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
नेमकं काय घडलं?मुरादनगर येथे राहणाऱ्या या तरुणीचं लग्न याच वर्षी मार्च महिन्यात मेरठच्या एका पीटी शिक्षकासोबत झालं होतं. लग्नात तिच्या वडिलांनी सुमारे ७५ लाख रुपये खर्च केले. हुंडा म्हणून २४ लाख रुपयांची महिंद्रा स्कॉर्पिओ, लाखो रुपयांची रोख रक्कम आणि दागिनेही दिले होते, असा आरोप आहे. इतका खर्च करूनही सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला.
पत्नीने मांडली व्यथापीडित महिलेने सांगितले की, लग्नाच्या पहिल्याच रात्री तिचा नवरा तिच्यासोबत राहीला नाही, उलट आई-वडिलांच्या खोलीत निघून गेला. लग्नानंतर तिचा पती तिच्यासोबत चांगलं वागत नव्हता. ती दिसायला खूप सुंदर नाही, म्हणून तो तिला रोज टोमणे मारायचा. "माझ्याशी लग्न करून माझं आयुष्य खराब झालं," असं देखील तो म्हणायचा. "मला तर नोरा फतेहीसारखी कोणीही सुंदर मुलगी मिळाली असती," असंही तो वारंवार बोलत होता, अशी तक्रार तिने केली आहे.
पीडितेचा आरोप आहे की, तिचा पती तिला रोज तीन-तीन तास जिममध्ये जायला लावत होता. 'नोरा फतेहीसारखं फिगर बनव' असं तो तिला म्हणायचा. जर तिने कमी व्यायाम केला, तर तिला जेवणही दिलं जात नव्हतं. एका दिवशी पतीने एका तरुणीसोबत चॅटिंग करताना ती पकडल्यावर पतीने तिला मारहाणही केली, असा आरोपही तिने केला आहे.
गर्भपाताचा धक्कादायक आरोपपीडितेने पुढे सांगितलं की, ती गरोदर असल्याची गोष्ट तिने सासूला सांगितली, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एका दिवशी पतीने तिला एक गोळी खायला दिली. नंतर ऑनलाईन तपासल्यावर तिला कळलं की ती गर्भपाताची गोळी होती. तिची तब्येत बिघडल्याने कुटुंबिय तिला माहेरी घेऊन आले. तिथे तिला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिचा गर्भपात झाल्याचं सांगितलं.
माहेरी गेल्यानंतरही छळ सुरूचजुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीडित महिला आपल्या नातेवाईकांसोबत सासरी गेली, पण सासरच्या मंडळींनी तिला घरात घेतलं नाही. दोन्ही बाजूंनी बोलणं निष्फळ ठरलं. अखेरीस, त्रासलेल्या या महिलेने पतीसह सासरच्या लोकांविरोधात हुंडा छळ, अपमानित करणे आणि गर्भपात केल्याच्या आरोपांखाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.