लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
By राजकुमार जोंधळे | Updated: May 3, 2025 21:29 IST2025-05-03T21:28:45+5:302025-05-03T21:29:34+5:30
७ मे पर्यंत पाेलिस काेठडी

लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
राजकुमार जाेंधळे / लातूर : माहेश्वरी बहुउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्या. लातूर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये ८ काेटी १८ लाख ८९ हजार ७०५ रुपयांच्या अपहार प्रकरणी गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. यातील दीड वर्षांपासून फरार असलेला रोखपाल सोमनाथ गोरख पंडीत याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकी (जि. धाराशिव) येथून रात्री १० वाजता अटक केली. त्याला शनिवारी लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ७ मे पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.
पाेलिसांनी सांगितले, फेब्रुवारी २०२४ मध्ये माहेश्वरी बहुउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्या. लातूर येथील शाखाधिकारी आणि राेखपाल याने अपहार केल्याची घडना घडली होती. त्यानुसार गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, लातूर यांनी दिलेल्या अहवालानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली. माहेश्वरी पतसंस्थेचा व्यवस्थापक, राेखपाल याच्यासह इतरांनी तब्बल ८ लाख १८ लाख ८९ हजार ७०५ रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती आणि अपहाराची रक्कम मोठी असल्याने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. गुन्ह्यातील दीड वर्षांपासून फरार असलेला राेखपाल सोमनाथ पंडीत हा ढोकी (जि.धाराशिव) येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकीत सापळा लावला. सोमनाथ पंडीत हा त्याच्या भावाच्या दुकानात आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला रात्री १० वाजता ताब्यात घेतले.
आरोपीच्या चाैकशीतून माहेश्वरी पतसंस्थेतील अपहाराची स्थिती, सहआरोपींची माहिती, अपहाराच्या रक्कमेचा विनियोग या बाबींचा खुलासा होणार आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपाधीक्षक सुरेशकुमार राऊत, अंमलदार राजेश्वर हम्पल्ले, नामदेव पाटील, युवराज गाडे, रामानंद इरपे, बाळासाहेब ओवांडकर, अर्जुन कार्लेवाड यांच्या पथकाने केली आहे.