चिमुरड्या लेकीच्या गळ्यात बापानं अडकवला फास; जीवे मारण्याची भाषा करू लागला अन् तितक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:53 IST2021-10-11T15:51:47+5:302021-10-11T15:53:43+5:30
चिमुरड्या लेकीला बाप घराच्या छतावर घेऊन गेला, तिच्या गळ्याला फास लावला; उपस्थितांचा पोलिसांना फोन

चिमुरड्या लेकीच्या गळ्यात बापानं अडकवला फास; जीवे मारण्याची भाषा करू लागला अन् तितक्यात...
रायसेन: मध्य प्रदेशातल्या रायसेनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका पित्यानं स्वत:सह दीड वर्षांच्या मुलीच्या गळ्यात फास अडकवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र एसडीओपी रायसेन आणि पोलिसांनी तत्परता दाखवल्यानं दोघांचा जीव वाचला.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर डीजीपींनी ट्विटरवरून रायसेनच्या पोलिसांचं कौतुक केलं. या घटनेचे फोटो, व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
रायसेन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या ३५ वर्षीय जगदीश कुशवाहनं त्याच्या दीड वर्षीय मुलीला (काजल) घरातून उचललं. त्यावेळी काजल आईजवळ झोपली होती. काजलला घेऊन जगदीश शेतात असलेल्या एका घरावर चढला. त्यानंतर त्यानं काजलच्या गळ्यात साडीपासून तयार केलेला फास अडकवला. त्याच्या हातात त्रिशूळासारखं हत्यार होतं. ते हत्यार दाखवून तो उपस्थितांना घाबरवत होता.
जगदीश चिमुरडीला छताला लटकवत होता. तिला जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. एसडीओपी अदिती भावसार आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी आशिष सप्रे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जगदिशनं काजलच्या गळ्यात फास अडकवल्याचं पाहिलं.
पोलिसांनी वारंवार समजावूनदेखील जगदिशनं ऐकलं नाही. जवळपास ४५ मिनिटं हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून काजलला ताब्यात घेतलं. त्यानंतर जगदिशनं छतावरून उडी मारली. त्याला गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली. आर्थिक परिस्थितीला कंटाळून जगदिशनं हे कृत्य केल्याची माहिती तपासातून समोर आली.