लकी ड्रॉ नको रे बाबा..! ॲमेझॉनच्या गिफ्टसाठी महिलेला मोजावे लागले तब्बल ९५ हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:39 IST2020-12-05T02:57:34+5:302020-12-05T07:39:26+5:30
महिलेची फसवणूक; मलबार हिलमधील घटना

लकी ड्रॉ नको रे बाबा..! ॲमेझॉनच्या गिफ्टसाठी महिलेला मोजावे लागले तब्बल ९५ हजार
मुंबई : ऑनलाइन शॉपिंगचे वेड त्यातच ॲमेझॉन शॉपिंगचे ‘लकी ग्राहक’ ठरल्याने महागडे गिफ्ट मिळणार असल्याचा कॉल येताच व्यावसायिकेच्या आनंदात भर पडली. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण, याच महागड्या गिफ्टसाठी त्यांना ९५ हजार रुपये मोजावे लागल्याची घटना मलबार हिलमध्ये घडली. या प्रकरणी मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फोटोग्राफीचा व्यवसाय असलेली ५३ वर्षीय तक्रारदार महिला मलबार हिल येथे राहण्यास आहे. गेल्या महिन्यात २४ तारखेला त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आले. यात, कॉलधारकाने तो ॲमेझॉन ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटमधून बोलत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. पुढे कंपनीचे ‘लकी ग्राहक’ ठरल्याने ‘बक्षीस’ मिळणार असल्याचे सांगितले. सावज जाळ्यात येताच, बक्षिसासाठीच्या विविध शुल्कांच्या नावाखाली त्यांच्याकडून ९५ हजार रुपये उकळले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
लकी ड्रॉ नकोरे बाबा..!
गेल्या काही दिवसांत लकी ड्रॉ, कौन बनेगा करोडपती लॉटरी तसेच विविध भेटवस्तू देण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.