नरेश डोंगरे
नागपूर : गृह मंत्रालयासह राज्य पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना अस्वस्थ करून सोडणारी बदल्यांची बोगस यादी मुंबई, रायगड अन् सोलापूरमधून फिरवण्यात आल्याचे वृत्त आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून फिरलेल्या या यादीने सोमवारी रात्रीपासून पोलीस अधिकारी आणि पत्रकारांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, वर्धा, यवतमाळसह ६२ ठिकाणच्या पोलीस अधीक्षक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याचे दर्शविणारी ही यादी सोमवारी रात्री ७ वाजतापासून वेगवेगळ्या व्हॉटस्अप ग्रुपवरून फिरू लागली. त्यामुळे बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीच्या संबंधाने एकमेकांकडे चौकशी केली. अनेकांनी गृह मंत्रालयातूनही शहानिशा केली. बदलीच्या या 'फेक लिस्ट'मध्ये अशा अनेक अधिकाऱ्यांची नावे आहेत ज्यांची चार महिन्यांपूर्वीच बदली झालेली आहे. उदा. विजयकुमार मगर यांची चारच महिन्यांपूर्वी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली तर राकेश ओला यांनीही चारच महिन्यांपूर्वी एसीबीचे अधीक्षक म्हणून सूत्र स्विकारली. असे असताना मगर यांना मिरा भाईंदरचे उपायुक्त तर ओला यांना बीडचे पोलीस अधीक्षक दर्शविण्यात आले. येथील उपायुक्त सारंग आवाड यांना यवतमाळचे अधीक्षक तर मनीष कलवानिया यांना पोलीस उपायुक्त मुंबई शहर दर्शविण्यात आले.
चारच महिन्यापूर्वी बदली झाली असताना आता आणखी तब्बल ६२ अधिकाऱ्यांच्या नावाची बदल्याची ही जम्बो यादी राज्यभरातील पोलीस, पत्रकारांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील व्हॉटस्अप ग्रुपवर फिरत असल्याने अनेक अधिकाऱ्यांची झोपमोड झाली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीही या संबंधाने शहानिशा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यामुळे गृहमंत्रालयासह पोलीस दलातही प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे बदली झालीच नसताना यादी कुठून आणि कुणी फिरवली, त्याची चौकशी सुरू झाली. अखेर ही यादी मुंबई, रायगड अन् सोलापूरातून व्हायरल झाल्याचे वृत्त आले. एका पोर्टलवाल्याने ती पेरल्याचाही संशय आहे. मात्र, ज्याने व्हायरल केली त्याने ही लिस्ट मिळवली कुठून हा प्रश्न आहे. त्याचेच उत्तर शोधले जात आहे.सोलापूरच्या ग्रुपवर दिलगिरी
या संबंधाने सोलापूरच्या पीटीसी ग्रुपवरून यासंबंधाने दलगिरी व्यक्त करणारी पोस्ट सुजित नामक तरुणाने टाकली, त्याने संबंधिताचे नाव टाकून रायगडच्या एका युवकाने माफी मागितल्याचेही त्यात नमूद केले.आहे.