हवाई सुंदरीला पटवण्यासाठी दारू तस्कराचा प्रताप; वर्षभरात ५० वेळा बिझनेस क्लासनं प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:36 IST2022-01-13T17:34:54+5:302022-01-13T17:36:27+5:30
वर्षभरात तब्बल ५० वेळा बिझनेस क्लासनं सिलिगुडी-दिल्ली प्रवास

हवाई सुंदरीला पटवण्यासाठी दारू तस्कराचा प्रताप; वर्षभरात ५० वेळा बिझनेस क्लासनं प्रवास
पूर्णिया: बंगालचा मद्य तस्कर समर घोषच्या अटकेनंतर त्याच्याबद्दलचे अनेक किस्से समोर आले आहेत. पोलीस चौकशीतून महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. मद्य तस्करीतून कमावलेला काळा पैसा समरनं पाण्यासारखा खर्च केला.
समर घोषनं सिलिगुडीतल्या बागडोगरा आणि दिल्ली दरम्यान वर्षभरात ५० वेळा बिझनेस क्लासनं प्रवास केला. हवाई सुंदरीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी त्यानं हा सारा खटाटोप केला. आपल्याकडे असणारा पैसा दाखवण्यासाठी समर वर्षभर हवाई प्रवास करत होता. त्यानंतर समरनं हवाई सुंदरीशी लग्न केलं. तिचं नाव सोनिया असून ती बुलंदशहरची रहिवासी आहे.
समरकडे असणारा पैसा पाहून सोनिया त्याच्या प्रेमात पडली. तिनं समरसोबत विवाह केला. समरचे वडील सुकुमार घोष बंगालच्या इस्लामपूरमध्ये जल संसाधन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आपण दारूची तस्करी करत असल्याचा संशय समरनं कुटुंबीयांना येऊ दिला नाही. आपण व्यवसाय करत असल्याचं त्यानं कुटुंबाला सांगितलं होतं.
समर घोष सोनियासह तिच्या भावालादेखील पार्ट्या द्यायचा. त्यावर तो लाखो रुपये उधळायचा. याच पार्ट्यांमुळे समरला अटक झाली. पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं त्याच्या मुसक्या आवळल्या. समरचं शिक्षण दहावीपर्यंत झालं असून आधी तो भाजी विकण्याचं काम करायचा. त्यानंतर त्यानं दारूची तस्करी सुरू केली. त्यातून त्यानं प्रचंड प्रमाणात काळा पैसा कमावला.