प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून न्यायालयाच्या कँटीनच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:54 IST2025-03-29T15:53:38+5:302025-03-29T15:54:26+5:30
पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतले आहे

प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून न्यायालयाच्या कँटीनच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ‘ए परशा, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करतोस काय?’ असे म्हणत वकील आणि रुकडीचा माजी उपसरपंच अमितकुमार भोसले याने न्यायालयाच्या कँटीनच्या आवारात शुक्रवारी प्रशांत कोरटकरच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतले आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या कोरटकरला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर त्याला न्यायालयाबाहेर नेण्यात येत होते. त्यावेळी प्रवेशद्वाराजवळच वकील अमितकुमारने कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला. दहा ते बारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आवारातील कँटीनमध्ये नेले. त्याने पुन्हा घोषणा देण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याचे तोंड दाबले. पोलिसांना चकवा देऊन आंदोलनाच्या प्रयत्नात असलेला आणखी एक सामाजिक कार्यकर्ता जयदीप शेळके यालाही पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले.
३० मार्चपर्यंत कोठडी
कोरटकरला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी शुक्रवारी कोल्हापूर पोलिसांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
चंद्रपूरच्या बुकीमालकाची आलिशान कार दिमतीला
चंद्रपूरचा बुकीमालक धीरज चौधरीची आलिशान कार कोरटकर लपण्यासाठी वापरत होता. तो फरार असताना तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांत होता. तो बुकीमालकासह अन्य चारजणांसोबत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.
आश्रयदाते किती?
फरार काळात कोरटरकर प्रशिक पडवेकर (रा. नागपूर), धीरज चौधरी (रा. चंद्रपूर), हिफाजतअली, राजेंद्र जोशी (रा. इंदोर), साईराज पेंटकर (रा. करीमनगर) यांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोरटकर गुन्ह्यातील संशयित असूनही त्याला त्यांनी आश्रय दिला, अशी माहिती सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी न्यायालयासमोर दिली.
धसका ‘कोल्हापुरी’चा
कोरटकरला कोल्हापुरी पायताणाचा हिसका दाखवू, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात होती.
कोल्हापूर पोलिस चंद्रपुरात
नागपूर/चंद्रपूर : कोरटकरने त्याला मदत करणाऱ्या पाच जणांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्यांना समन्स बजावले असून, त्यांची सखोल चौकशी होणार आहे. त्यात नागपुरातील तीन सहकाऱ्यांचा समावेश आहे. कोरटकर ११ ते १५ मार्चदरम्यान चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे लपून होता.