मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका महिला फिजिओथेरपिस्टला अटक केली आहे. त्या महिलेने रुग्णालयाच्या परिसरातील मंदिरात असलेली चांदीची मूर्ती चोरली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत पोलिसांनी मूर्ती देखील जप्त केली आहे.
मिसरोड येथील एका खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या मंदिरातून ६० हजार रुपये किमतीची लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या आधारे तपास करत असताना, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केलं तेव्हा एक संशयास्पद महिला हातात दोन बॉक्स घेऊन जाताना दिसली. नंतर ती महिला गाडीत बसते आणि तिथून निघून जाते.
गाडीच्या नंबरवरून महिलेची ओळख पटली आहे आणि जेव्हा पोलीस तिच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे चोरी केलेली मूर्ती देखील आढळते. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिचा छंद पूर्ण करण्यासाठी तिने देवीची मूर्ती चोरली होती. सध्या पोलिसांनी महिलेकडून मूर्ती जप्त केली आहे आणि चोरीसाठी वापरलेली कारही जप्त केली आहे.