भांडण सोडवण्यासाठी गेलेल्याची चाकू पोटात खूपसून हत्या; विरारच्या गोपचरपाडा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:18 IST2022-08-09T15:17:59+5:302022-08-09T15:18:15+5:30
हत्या अंमली पदार्थांच्या नशेसाठी केली असल्याचाही पोलिसांना दाट संशय आहे.

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्याची चाकू पोटात खूपसून हत्या; विरारच्या गोपचरपाडा येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा :- मित्रासोबत आरोपीचे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणाची चाकू पोटात घुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारच्या गोपचरपाडा परिसरात झाली आहे. विरार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
चंदनसार रोडवरील साईदत्त नगरमधील झोपडपट्टीत राहणारा मोहम्मद सद्दाम मन्सूरी (३०) हा मित्र मुमताज आणि अन्वरुल यांच्यासोबत ५ ऑगस्टला गोपचरपाडा येथील जय जगदंबा मेडिकलच्या समोर गप्पा गोष्टी करत उभे होते. त्याचवेळी मित्र अन्वरुल याच्यासोबत अनोळखी आरोपीचे भांडण सोडवण्यासाठी सद्दाम हा गेला. त्याचा राग येऊन आरोपीने त्याच्या हातातील चाकू सद्दाम याच्या पोटाच्या डाव्या बाजूला आणि पाठीवर वार करून जखमी केले. जखमी अवस्थेतील सद्दामला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्याची प्रकृती स्थिर नसल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यास सांगितले.
त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले पण त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सद्दामचा भाऊ हैदरअली (३८) यांनी विरार पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी आरोपी दानिश शेख (२५) याला कुर्ला येथून सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीला मंगळवारी अटक करून विरार पोलिसांच्या ताब्यात तपासाला देणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी लोकमतला माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या अंमली पदार्थांच्या नशेसाठी केली असल्याचाही पोलिसांना दाट संशय आहे.