वादातून शस्त्राने वार करत तरूणाची हत्या; भंडारा शहरातील घटना
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: March 12, 2024 20:37 IST2024-03-12T20:36:43+5:302024-03-12T20:37:12+5:30
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

वादातून शस्त्राने वार करत तरूणाची हत्या; भंडारा शहरातील घटना
भंडारा : वादातून दोघांनी एका तरुणावर चाकुने सपासप वार केले. यात तरूण जागीच गतप्राण झाला. कपील अशोक उजवणे (३१, भगतसिंग वॉर्ड टाकळी) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवार मध्यरात्रीच्या सुमारास शहराला लागून असलेल्या टाकळी येथे घडली असली, तरी मंगळवारला सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हत्येनंतर कपीलचा मृतदेह लपविण्यासाठी नालीत फेकून त्यावर दुचाकी ठेवण्यात आली. ऋषभ संजय दोनोडे (२०) आणि करण दिलीप भेदे (२०) दोन्ही रा. भगतसिंग वॉर्ड टाकळी अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. मंगळवार सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच ताफा घटनास्थळी दाखल झाला.
पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी ऋषभ दोनोडे आणि करण दिलीप भेदे यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी करीत आहेत.
अशी केली हत्या
माहितीनुसार, कपील व ऋषभ आणि करण यांच्यात सोमवारच्या रात्री टाकळी येथे वाद झाला. भांडण विकोपाला गेले. यातूनच ऋषभ आणि करण यांनी कपीलला टाकळी येथील निर्वाण मेटल कंपनीच्या मागील बाजुच्या मैदानात नेले. तिथे चाकूने कपीलच्या छातीवर, चेहऱ्यावर अनेक वार करुन जिवानीशी ठार मारले. या दोघा मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कपीलचा मृतदेह उचलून मेटल कंपनीच्या मागे असलेल्या सिमेंटच्या नालीत नेऊन फेकला. त्यानंतर मृतदेहावर दुचाकी ठेवून ते पसार झाले.