‘हनिट्रॅप’मध्ये अडकवून तरुणाचे अपहरण, तरुणीसह सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:19 AM2020-11-03T07:19:56+5:302020-11-03T07:20:17+5:30

Crime News : उत्तर प्रदेश येथून काही दिवसांपूर्वीच वागळे इस्टेट येथे हा तरुण भावाकडे वास्तव्यासाठी आला होता. या तरुणाचे गावी असताना नर्गिस मो. जावेद ऊर्फ नन्हे शेख (२०) या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते.

Kidnapping of a young man trapped in a honeytrap, arrest of seven people including a young woman | ‘हनिट्रॅप’मध्ये अडकवून तरुणाचे अपहरण, तरुणीसह सात जणांना अटक

‘हनिट्रॅप’मध्ये अडकवून तरुणाचे अपहरण, तरुणीसह सात जणांना अटक

Next

ठाणे : चार लाख रुपयांच्या खंडणीसाठी वागळे इस्टेट भागातील तरुणाला ‘हनिट्रॅप’मध्ये अडकवून त्याच्याच कथित प्रेयसीने तिच्या साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना वागळे इस्टेट पोलिसांनी उघडकीस आणली. खंडणी दिली नाही तर खुनाची धमकीही त्याला दिली होती. या तरुणीसह सात जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी सोमवारी दिली. सर्व आरोपींना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
उत्तर प्रदेश येथून काही दिवसांपूर्वीच वागळे इस्टेट येथे हा तरुण भावाकडे वास्तव्यासाठी आला होता. या तरुणाचे गावी असताना नर्गिस मो. जावेद ऊर्फ नन्हे शेख (२०) या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. पुढे तो ठाण्यातील वागळे इस्टेट येथे वास्तव्यासाठी आल्यानंतर नर्गिसही तिच्या वडिलांना घेऊन वसई येथे तिचे नातेवाईक सबीना हिच्या घरी आली. त्यांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला. त्यानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी ती त्याच्या कामाच्या ठिकाणी आली. तिने त्याच्याशी संपर्क साधून वसई येथील बजरंग ढाबा परिसरात त्याला बोलविले. तो त्याठिकाणी पोहोचल्यानंतर मोटारकार त्याठिकाणी आली. या वाहनात नर्गिस, तिचे वडील मोहम्मद जावेद शेख आणि त्यांचे आणखी पाच साथीदार होते. या सात जणांनी या तरुणाचे अपहरण करून त्याला त्या वाहनातून वसई येथे नेले. तेथील मोहम्मद परवेझ शेख (२९) याच्या घरात डांबून जबर मारहाण केली. त्याच्या भावाला फोन करून अपहरणकर्त्यांनी चार लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास तरुणाच्या खुनाचीही धमकी त्यांनी दिली. भावाने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ३१ ऑक्टोबर रोजी तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, विजय मुतडक आदींनी दोन तपास पथके तयार करून आराेपींच्या मुसक्या आवळल्या.

सापळा रचून केली तरुणाची सुटका
-  तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अपहृत तरुणाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार सापळा रचून १ नोव्हेंबर रोजी विरार येथून या तरुणाची सुटका केली.
-  कथित प्रेयसी नर्गिस, तिचे वडील मो. जावेद शेख तसेच त्यांचे साथीदार मोहम्मद शेख, सबीना शेख, अमित परिधनकर, अरुण पणीकर आणि लोकेश पुजारी अशा सात जणांना अटक केली.

Web Title: Kidnapping of a young man trapped in a honeytrap, arrest of seven people including a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.