पुणे : फिरायला जाऊ असे सांगून अल्पवयीन मित्राचे अपहरण करुन त्याचा खुन करून भावाकडे ४० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार भोसरी पोलिसांनी उघडकीस आणला असून एकाला अटक केली आहे. उमर नासीर शेख (वय २१, रा. दापोडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.अब्दुलअहद सय्यद सिद्धिकी (वय १७, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे खुन झालेल्याचे मुलाचे नाव आहे. याबाबत भोसरी पोलिसांनी सांगितले की, उमर शेख हा भंगार वेचरण्याचे काम करतो. अब्दुल हा बारावीमध्ये शिक्षण घेत होता़ तसेच भाजीपाल्याचा व्यवसायही करत होता.उमर आणि अब्दुल हे दोघेही मित्र आहेत. शनिवारी सायंकाळी उमर शेख याने अब्दुल सिद्धिकी याला फिरायला जाऊ असे सांगून त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणले. तेथे त्याचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर त्याने रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अब्दुल याच्या भावाला फोन केला व तुझ्या भावाला किडनॅप केले आहे. ४० लाख रुपये दे नाहीतर मारुन टाकतो, अशी धमकी दिली. अब्दुल यांच्या भावाने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आलेल्या फोनचे रेकॉर्डिग ऐकल्यावर त्यांना आवाज ओळखीचा वाटला.सिद्धिकी याच्या भावानेही हा आवाज उमर याचा असल्याचा संशय आला. त्यावरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. उमर याला ताब्यात घेतले असता त्याने अब्दुल याचा खुन केल्याची कबुली दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अब्दुल याचा खुन केल्याचे त्याने सांगितल्यावर पोलीस पहाटे विद्यापीठात पोहचले. पोलिसांनी अब्दुल याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उमर शेख याला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 08:57 IST